पान:सफर मंगळावरची.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "तुमच्या वर्तमानपत्रात बातमी टाकायला विसरू नका. एक चिमुरडी पोर मृत्यूशी झुंज देऊन आलीय म्हणून."
 "डॉक्टर खरंच तुमचं फार फार आभार. हेलन आता पूर्ण बरी झालीय ना ?" हेलनचे वडील म्हणाले.
 "हो आता काही काळजी करू नका. तिची तब्येत एकदम खणखणीत झालीय. आता तिच्या अवखळपणाला आवरण्याकरता तुम्हाला तब्येत धडधाकट ठेवावी लागेल. एवढं औषध तिला देऊन निवांत झोपा. खूप जागरणं केलीत तुम्ही. आता तुमच्या मुलीला काहीही होणार नाही." डॉक्टर जायला निघाले. त्यांची बॅग घेऊन हेलनचे वडील फाटकापर्यंत गेले.
 "डॉक्टर, खरंच हेलन बरी होईल ना ? की आम्हाला धीर देण्यासाठी..."
 "नाही नाही. मि. केलर, मरण कुणाला चुकलंय? जे अटळ आहे त्याला धीराने सामोरं जायलाच हवं. पण तुमच्या मुलीला सध्या तरी त्याची धास्ती नाही. "
 डॉक्टरांनी हेलनच्या वडिलांच्या खांद्यावर हात थोपटले. डॉक्टर गेल्यावर केलर आत आले. तेव्हा हेलनच्या आईच्या किंकाळीचा आवाज आला. केलर आत धावत आले. घाबरून त्यांनी हेलनच्या आईला विचारलं.
 "काय झालं केट ?"
 " माझी लाडकी हेलन." हेलनची आई विस्फारल्या डोळ्यांनी हेलनकडे पहात होती.
 " जागी का झोपलीय पहाण्यासाठी मी तिच्याकडे गेले तर तिचे डोळे सताड उघडे. अहो तिला दिसत नाही." असं म्हणून केट रडू लागली.
 हेलनचे वडील धावतच पाळण्याकडे गेले. घाबरून म्हणाले.
 "दिसत नाही ?"
 “हो आणि ऐकायलासुद्धा येत नाही." हेलनची आई हुंदके देऊ लागली. हेलनचे वडील हेलनला जोराजोरात. 'हेलन, हेलन' अशा हाका मारू लागले. त्यांचा आवाज भयानक झाला. नंतर डोक्याला हात लावून ते तिथेच बसले. केट तर बेशुद्ध पडण्याच्याच बेतात होती. पण तिनं स्वत:ला सावरलं. हेलन आजारातून उठली म्हणून थोड्यावेळापूर्वी केवढी आनंदली होती....

 हेलन आंधळी बहिरी असल्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं. तिची सतत धडपड चाललेली असायची. तिचा मेंदू मात्र तल्लख होता. त्यामुळे तिला स्वस्थ

८६ । सफर मंगळावरची