पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कायदा, मालमत्तेत पत्नी-मुलींचा वाटा हे कायदे केले. विधवा विवाहासाठी खर्चास सरकारकडून मदत दिली जाई.
 समाजाने किंवा मुख्य प्रशासनाने समाजविघातक परंपरा चालू द्याव्यात की बंद कराव्यात याबद्दल सयाजीरावांनी हिमतीने आणि जबाबदारीने एक एक निर्णय घेतले. हे करताना राजनीतिशास्त्रीसंबंधी त्यांची भूमिका स्पष्टच दिसून येते. या सामाजिक सुधारणा अनेक समकालीन उच्चवर्णीय सुधारक अन् राष्ट्रीय चळवळ करणाऱ्या युगपुरुषांना आवडल्या नाहीत. काहींनी महाराजांच्या या सुधारणासंबंधी टीकाही केली. ही विषारी प्रतिकूल टीका सहन करून त्यांनी धाडसाने अनेक अवघड प्रश्न कुशलतेने सोडविले. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने त्यांना वेळोवेळी परदेश प्रवास करावा लागला. या डोळस प्रवासाभ्यातून ते सामाजिक सुधारणांकडे जबाबदारीने पाहू लागले. त्या सुधारणा घाईने न करता, टप्प्याटप्प्याने एक एक सुधारणा आणि कायदे करत गेले.

 कवळाणे गावातून बडोदे राजगादीवर आलेल्या सयाजीरावांनी ग्रामव्यवस्थेतील सर्व जाती-धर्मातील सलोखा अनुभवला होता. बालपणात सर्व जातींच्या मित्रांसोबत खेळणे, पोहणे, गुरे चारणे हा समानतेचा अनुभव गाठीशी होता. इ.स. १८७७ साली ते रेल्वेने दिल्लीला निघाले होते. रस्त्यात अहमदाबादेत रेल्वे थांबली. रेल्वे उपाहारगृहात सगळे भोजनासाठी उतरले. उपाहारगृहात इंग्रज लोकांसाठी, भारतीय उच्चवर्णीयासाठी

सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / १२