पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजे बनले. जन्मगावी कवळाणे येथे लक्ष्मीसोबत सरस्वतीची कृपा नव्हती. राजा बनल्याने सुदैवाने लक्ष्मी लाभली; पण या सरस्वतीची कृपा त्यांनी मेहनत कष्टाने साधली. त्यावेळी या तरुण राजाने ओळखले, कोणतीही प्रगती ही नशीब अथवा दैवयोगावर कधीच अवलंबून नसते. ती कर्त्याच्या पुरुषार्थावर असते. याकरिता राजाने जनसेवेत आणि जनकल्याणातच आपला मोक्ष शोधावा. हेच काम सयाजीराव महाराजांनी आयुष्यभर रयतेच्या कल्याणाचा ध्यास घेतला.

 जागतिक विचारवंत म्हणतात, आदर्श व सुप्रशासनाची राज्यपद्धती निर्माण करण्यासाठी प्रज्ञावंत प्रशासकाच्या हाती राजसूत्रे असली पाहिजेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजा सयाजीराव होते. महाराजांचा कामाचा उरक विलक्षण होता. प्रशासनातील समज द्रष्टेपणाची असल्याने एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी केलेली कामे व निर्णय ही सुप्रशासनाची उदाहरणे सांगता येतील. उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, गरीब- श्रीमंत, काळा-गोरा असा भेदाभेद त्यांच्यात नव्हता. दुसऱ्यांच्या ज्ञानाबद्दल आदर, अनेक विषयांबद्दलीची रसिकता, स्वत:ची तीव्र, ज्ञानलालसा, विचारांची सचोटी, बारीक गोष्टीतही चिकित्सेची आवड, दांडगी स्मरणशक्ती, नवे जोडावे पण जुने सोडू नये हा बाणा, उज्ज्वल देशभक्ती, सामान्य कर्तव्यनिष्ठा, प्रबोधनशक्ती आणि जगावेगळे दातृत्व या त्यांच्या गुणामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचाहत्तर वर्षांचा इतिहास हा महाराजा सयाजीरावांच्या सर्वक्षेत्रातील झगमगता कालखंड आहे.

सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / २०