पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक, सांस्कृतिक आणि धर्म या विषयात केलेल्या कामांचे वेगळेपण तपासणे, हा आजच्या वर्तमानावर उत्तर शोधण्याचा अल्पसा प्रयत्न या टिपणात मी करत आहे. एकेकाळी जगात बलाढ्य साम्राज्याचे मालक आणि सुधारलेले राष्ट्र टेंभा डौलाने मिरविणाऱ्या ब्रिटिशांना आपल्या सुधारणांमुळे लाजेने मान खाली करावयास लावणारे एकच एक सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारताचे शिल्पकार होऊन गेले. सत्तर वर्षे हा इतिहास काहींना काही कारणाने अभ्यासक, संशोधक आणि लेखकांकडून पुनर्वाचन करणे राहून गेलाय. ते अल्पसे काम आपण करत आहोत.
चौसष्ट वर्षांची सुखावह कारकीर्द :

 महाराजा सयाजीरावांनी चौसष्ट वर्षांची कारकीर्द ही आधुनिक भारताच्या सुप्रशासनाची अनेक क्षेत्रांतील पायाभरणीच होती. राजा बनल्यावर स्वतः शिकून, शिक्षण हेच परिवर्तनाचे एकमेव साधन आहे, हे त्यांनी ओळखले. मूळत: हुशार, नवे शिकण्याची त्यांची चिकाटी यातून त्यांचा ज्ञानाचा तिसरा डोळाच उघडला गेला. सहा वर्षांच्या प्रशासन व व्यवहार शिक्षणाच्या अध्ययनातून त्यांनी जाणले, राजाला अधिकार आणि सत्तेतून जनतेसाठी कल्याणकारी गोष्टी करता येतील. त्यांच्या देशीय आणि परदेशीय गुरुवर्यांनी किशोरवयीन राजाच्या मनावर पक्के बिंबविले की, शिक्षण हाच प्रगती आणि परिर्ववनाचा एकमेव मार्ग आहे. ते प्रजेला उत्तम प्रकारे देणे हे राजाचे कर्तव्य आहे.

 सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / ७