पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गौरव केला. तीन हजार रुपयांचे कर्ज काढून सुरू झालेल्या या मार्केट यार्ड कमिटीचे व्यवहार कित्येक कोटी रुपयांच्या घरात गेले आहेत. हे मार्केट यार्ड म्हणजे आता सांगलीचे भूषणच झाले आहे.
 साखर कारखाना :
 सांगली परिसरातील शेतकरी कुटुंबे पिढ्यान् पिढ्या वसंतदादांचे उपकार विसरणार नाहीत. मार्केट यार्ड कमिटीची स्थापना आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे साखर कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांची असलेली धडाडी व दूरदृष्टी विसरणार नाहीत. ही खरोखरच क्रांतिकारी घटना होती.
 १९५२ मध्ये केंद्र सरकारने साखरेवरील नियंत्रण उठवले. त्यामुळे साखरेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. परदेशातून साखर आयात करण्याच्या कामी मौल्यवान परकीय चलन वाया जात होते. यावर उपाय म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या शिफारशीनुसार आणि आग्रहानुसार सहकारी क्षेत्रामध्ये साखर कारखान्यांना परवानगी देण्याचे ठरले. संपूर्ण देशात २३ कारखाने निघावयाचे होते. त्यातील १२ कारखाने तत्कालिन मुंबई प्रांतात निघणार होते.

 कोल्हापूर-सातारा जिल्ह्यात साखर कारखाने काढण्याची परवानगी मिळाल्याचे कळल्यावर वसंतदादांना चैन पडेना. आपल्या लाडक्या सांगली जिल्ह्यात साखर कारखाना नाही म्हणजे काय? आपले सहकारी मित्र बॅ. जी. डी. पाटील यांच्याबरोबर वसंतदादांचे या संबंधातील चिंतन सातत्याने चालू होतेच. इतर अनेक मित्रांबरोबरही चर्चा केली

२६ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील