पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवश्यक आहे हे त्यांना समजावले. आपले सहकारी बॅ. डी. जी. पाटील, आबासाहेब शिंदे, दत्ताजीराव सूर्यवंशी, धुळाप्पा नवले आदी मंडळींना बरोबर घेऊन वसंतदादा गावोगावी हिंडले. शेतकऱ्यांना भेटून त्यांची पाण्याची सोय किती आहे, कशी आहे याचा अंदाज घेतला. शेतकऱ्याला खते वा अन्य काही मदतीची आवश्यकता आहे का याचा अंदाज घेतला. या सगळ्या गोष्टी करताना वसंतदादांची दमछाक झाली खरी, पण अशा थेट संपर्कामुळे शेतकऱ्यांचा विश्वास त्यांना मिळविता . ही खरी वसंतदादांची मोठीच गुंतवणूक होती. अक्षय गंगाजळी होती. याच मोठ्या भांडवलाच्या आधारावर वसंतदादांना पुढे अनेक कल्याणकारी योजना मार्गी लावता आल्या.

 मार्केट यार्ड कमिटीच्या कामामुळे वसंतदादांविषयी सर्वांच्या मनात एक वेगळीच आशा, अपेक्षा निर्माण होऊ लागली होती. पारंपरिक शेती करण्यापेक्षा या उसासारख्या नगदी पिकाकडे शेतकरी वळू लागला. साखर कारखान्याचे शेअर्स घेऊ लागला. ज्यांची शेअर्स घ्यायची इच्छा आहे पण पैसा नाही, अशा शेतकऱ्यांना वसंतदादांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळवून दिले. १३ लाख रुपयांचे भागभांडवल अशा अथक प्रयत्नांतून उभे राहिले. सरकारने आपला दहा लाखांचा वाटा उचलला आणि एप्रिल १९५७ मध्ये कारखान्यांच्या खात्यावर जमा केला. इंडस्ट्रियल फिनान्स कॉर्पोरेशनने ५५ लाखांचे कर्ज मंजूर केले. सांगली-माधवनगर रस्त्यावरील ९० एकराची जमीन साखर कारखान्यासाठी मिळविण्यात आली. त्यावर उसाची लागवडही करण्यात आली.

२८ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील