पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २४ जुलै १९४३ चा दिवस. वार होता शनिवार. आठवड्याच्या बाजाराचा दिवस. भाजीवाले, फळवाले, चार पैसे कमवायला आलेले आजूबाजूचे खेडूत. कलकलाट माजला होता.

 अचानक गोंगाट झाला. पळापळ सुरू झाली. 'कैदी पळालेत, सांगलीचा तुरुंग फोडून पळालेत. हातात बंदुका आहेत' असा आरडाओरडा चालू असतानाच हवेत बंदुका उडवत कृष्णा नदीच्या दिशेने काही कैदी पळताना दिसले. लोकांची पांगापांग झाली. बाजार ओस पडला. मागोमाग शिपाई वेगाने पाठलाग करत पळत होते. त्यांच्या शिट्ट्यांचा कर्कश आवाज ऐकू येऊ लागला. कैदी नदीकाठच्या गाळातून पळत होते. काही शिपाई घोड्यावरून नदीकाठाने त्यांचा पाठलाग करत होते. नदीच्या पात्रातून उडी मारून पोहत चाललेल्या एका कैद्याला वर्मी गोळी बसली. लालसर कारंजे उडाले. एकूण प्रकार बघून एका कैद्याने नदीकाठच्या झाडाचा आश्रय घेतला. पाठलागावर येत असलेल्या शिपायांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला. अशा प्रकारच्या प्रतिहल्ल्याची अपेक्षा नसल्याने शिपाई भांबावले. त्या गोंधळाचा फायदा उठवावा या हेतूने उलट गोळीबार करत असलेल्या त्या कैद्याने इतर कैद्यांना "हरिपूरच्या संगमाच्या बाजूला पळा, तोवर मी या शिपायांना अडवतो,” असे ओरडून फर्मावले. फैरीवर फैरी झडत होत्या. पण दुर्दैव आडवे आले. झाडाच्या आडोशाने गोळ्या झाडत असलेल्या त्या कैद्यांच्या नायकाच्या बंदुकीचा घोडा अडला. तो सरळ करण्याच्या गडबडीत त्या नायकाच्या खांद्याचा थोडासा भाग शिपायांना दिसला. सटासट गोळ्या त्या दिशेने गेल्या. तो शूरवीर धाडकन जमिनीवर कोसळला. बेशुद्ध झाला. गोळी खांद्यातून आरपार गेली होती. शिपायांनी लागलीच त्याला जेरबंद केले.

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ५