पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आज तीस-पस्तीस कंपन्या भडंगनिर्मितीत गुंतल्या आहेत. सांगलीच्या माणसाची ख्याती, उत्तम पोहणारे आणि अत्तम खवय्ये म्हणून होती. जिलबीची अख्खी ताटेच्या ताटे बसल्या बैठकीला फस्त करणारे खवय्ये या सांगलीत अनेक होते. या खादाडीवरून सहजच आठवण होते ती सांगलीच्या कमलाताई ओगले यांची. विविध प्रांतातील, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांबाबत त्यानी आपल्या 'रुचिरा' या पाककला पुस्तकाद्वारे, समर्थपणे मार्गदर्शन केले आहे. पाककला या विषयावरील सर्वमान्य झालेलं 'रुचिरा' हे मराठीमधील पहिलंच पुस्तक असावं. त्यांच्या पाककलांच्या प्रात्यक्षिकांचे वर्ग परदेशातसुद्धा झाले. तेव्हा कर्तृत्ववान सांगलीकरांची यादी करायची म्हटलं तर ती मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबतच जाते. अपरोक्त वर्णनात स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकांचाच परामर्श प्रामुख्याने घेतला गेला आहे. अलीकडील पन्नास वर्षांच्या काळातील सांगलीकरांच्या कर्तृत्वाचा परामर्श घेण्यास आपण सहजपणे थांबू शकतो; मात्र विस्मृतीच्या गर्तेत जाणाऱ्या कर्तबगार आणि वैशिष्टयपूर्ण सांगलीकरांची स्मृती जतन करण्याच्या प्रयत्नात अनेक नावे ओठांवर येऊनही, बघता बघता अंतर्धान पावतात! महाराष्ट्राला 'स्वाध्याय ज्ञानेश्वरी' शिकविणारे आणि पट्टीचे वक्ते म्हणून सर्वमान्य झालेले केशवराव छापखाने, लोकमान्यांच्या 'गीतारहस्याचे' निर्भीडपणे खंडन करणारे व महाराष्ट्राला ‘भागवतादर्श' दाखवणारे यशवंतराव कोल्हटकर सांगलीचेच. सुप्रसिध्द उद्योगपती आबासाहेब गरवारे हे सांगलीचेच. त्यांनी सांगलीत माधुकरी मागून स्वतःची उन्नती करुन घेतली होती. सांगलीत औद्योगिक पाया घालणाऱ्या अनेक सांगलीकरांपैकी, रामभाऊ भिडे हे अतिशय कल्पक गृहस्थ होते. शेंगा फोडण्याची मशिन्स प्रथम त्यांनी बनविली होती. ती किर्लोस्कर मंडळींना इतकी आवडली की त्यांनी त्याचे पेटंट भिडे मंडळींकडून घेतले. गणपतरावजी अभ्यंकर, गणपतीरावजी गोडबोले, केशवराव चौगुले, पाटील वकील वगैरे मान्यवरांनी वकिली क्षेत्रात नैपुण्य दाखविलेच पण त्याबरोबरच सामाजिक बांधिलकेचेही भान राखले. व्यायामपटू रास्तेमास्तर, स्काअटमास्तर आठवले, क्रीडाशिक्षक हणमंतराव भोसले, नाना देवधर, शिक्षणतज्ञ वा.गो.शिराळकर अशा काही जुन्या सांगलीकरांपासून तो अलीकडच्या काळातील शिक्षणक्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती कळंत्रेअक्का, गुलाबराव पाटील, क्रिकेटपटू विजय भोसले, यांच्याबरोबरच आज सांगलीचे नाव गाजवलेले छायाचित्रकार गोपाळराव बोधे, एन्रॉनमधील अच्चपदस्थ संजीव खांडेकर, मधुरा सिहांसने. आय. ए. एस. मध्ये नैपुण्य दाखविणारी अश्विनी कुलकर्णी, गुंडांशी सामना करणारी, धाडसी महिला पोलिस अधिकारी मृदुला लाड अशा अनेक सांगलीकरांची आठवण होते आणि एक किस्सा आठवतो. सांगली आणि सांगलीकर.. .२३६