पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगलीतील प्रेक्षणीय स्थळे सांगली हे गाव रम्य असले तरी ते काही पर्यटनस्थळ नव्हे. तरीपण पाहुण्याला आवर्जून दाखवावीत अशी काही प्रेक्षणीय स्थळे सांगलीत आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय खालीलप्रमाणे : - १. गणेशदुर्ग : श्रीमंत थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यानी १८०१ मध्ये सांगली हे संस्थानचे प्रमुख ठाणे अधिकृतपणे बनवल्यावर, मिरजेच्या किल्ल्यासारखी सुरक्षित जागा त्याना राजधानीसाठी आवश्यक वाटली असावी. त्यामुळे श्रीमंतानी गणपतीमंदिर बांधण्यापूर्वीच गणेशदुर्ग (राजवाडा) बांधायची योजना आखली. कृष्णा नदीपासून ४-५ फर्लांगावर असलेला हा गणेशदुर्ग, अत्तराभिमुख असलेला भुईकोट किल्ला आहे. त्याच्या बांधकामास १८०५ साली सुरुवात झाली. तशी त्याची पूर्वतयारी १८०१ पासूनच सुरू झाली होती. १८०७ साली सर्व बांधकाम पूर्ण झाले होते. राजघराण्यातील मंडळीना निवासासाठी जागा आणि दरबार, कोर्ट-कचेऱ्यांसाठी जागा असे या गणेशदुर्गाचे स्वरुप होते. किल्ला आणि आतील वाड्याचा आराखडा जागेवर गारगोट्या मांडून आखण्यात आला होता. खुद्द श्रीमंत चिंतामणराव, पेशवे सरकारच्या वतीने अनेक मोहिमांमध्ये गुंतलेले असल्याने, राजघराण्यातील मंडळीनी प्रत्यक्ष राहायला सुरुवात १८१०-११ साली केली. सांगलीच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू आजच्या काळातसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणून ओळखली जाते. किल्लयाच्या भोवती पूर्वी खंदक होता; त्यात पाणी होते. त्यालगत असलेल्या तटबंदीवर चारी बाजूनी ५ बुरूज होते. त्यांची नावे होती १ ) श्रीसंगमेश्वर बुरूज २) नाग बुरूज ३) कृष्णा बुरुज ४) चांद बुरूज आणि ५ ) सीकाचा बुरूज. काळाच्या ओघात खंदक बुजले, बऱ्याच ठिकाणची तटबंदी जमीनदोस्त झाली. तरीसुद्धा प्रवेशदारातच असलेल्या भव्य काटेदरवाज्याच्या समोर असलेला 'श्रीगणेश बुरूज' आणि काटेदरवाजाच्या लगत असलेले 'जय' बुरूज आणि 'विजय' बुरूज आजही विद्यमान आहेत. काटे दरवाज्यासाठी वापरलेले जाड लोखंडी पत्रे आणि मोळे - खिळे राजापूरच्या बाजारातून आणवले होते. मधील पटांगणात असलेल्या दरबार हॉलमधून संस्थानचा कारभार चालत असे. पटागंणात दरबार हॉलच्या समोर दिसणाऱ्या तीन भव्य दगडी कमानी नंतर म्हणजे १८८४ साली बांधण्यात आल्या होत्या. आज जिल्हाधिकारांच्या कचेऱ्या वाड्यातील अिमारतींमध्ये आहेत. गणेशदुर्गाच्या प्रवेशद्वारापाशी जिल्हा न्यायालये आहेत. आतील बाजूस सांगली स्टेट म्युझियम सांगली आणि सांगलीकर. . २५७