हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचा अर्थ होऊ शकत नाही. माणसं एकटी राहतात, मीही राहूं शकेन. प्रश्न फक्त सवयीचा आहे.
 एकटेपणाची भीती वाटत होती तरी त्या भीतीपोटी परत रामकडे जायला मन होत नव्हतं. दोन माणसांतलं नातं बदलतं कसं? का? हयाचा ती विचार करीत होती. स्मिता, तिची मुलगी, म्हणायची की लग्न हेच दोन माणसांतलं सुंदर नातं नासवून टाकतं. पण ज्योती आणि रामचं नातं त्यांच्या लग्नापासून सुरू झालं. ज्योतीला नाटकी शब्द आवडत नसत. त्यांच्यातलं नातं सुंदर होतं की नाही कोण जाणे, पण जे काय होतं त्यात ती सुखात होती. इतकं की कधी कधी ती स्वतःला विचारायची, " मी असं काय पुण्य केलं होतं म्हणून हे सगळं मला मिळालं?" हे सगळं मिळण्याला आपण लायक नाही असं कुठेतरी वाटत राहिल्यामुळे काहीतरी होईल आणि हे सगळं फटक्यात नाश पावेल अशी तिला भीती वाटायची. पण तिचं सुख असं संकटाच्या एका फटक्यासरशी नष्ट झालं नाही. ते इतक्या हळहळ आणि चोर पावलांनी विरत गेलं की कड्यावर उभं राहून समोरची खोल दरी दिसेपर्यंत ते विरलंय हे तिला कळलंच नाही.

साथ:१०१