हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच्याशी वाद घातला नाही. तिला वाटत होतं की बिचाऱ्या पोराला दिवसभर एकटं ठेवण्याची भरपाई म्हणून काहीतरी करायला पाहिजे. त्याला जेवण भरवल्यामुळे त्याला जर आई आपल्याकडे जास्त लक्ष देतेय असं वाटलं तर कुठे बिघडलं ? शिवाय तो जास्त चांगला जेवायचा पण.
 प्रताप पहिल्यापासूनच हडकुळा, अशक्त, फिकट दिसायचा. दिसायलाही नाजूक होता. इतर मुलांबरोबर बाहेर खेळायला जाण्याऐवजी त्याला घरात बसून वाचायला, रेडिओ ऐकायला आवडायचं. त्याला अंधाराची भीती वाटायची, पळताना पडून गुडघे खरचटले म्हणजे तो रडायचा आणि राम कितीही हॅ:, रडतोस काय, मुलगी आहेस का असं म्हणाला तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नसे. स्मिता प्रतापपेक्षा दोन वर्षांनी लहान होती. ती दोघं एकमेकांपेक्षा इतकी वेगळी होती की त्यांच्याकडे बघून रामला सारखी आपलं स्वप्न आणि सत्य ह्यांच्यातली दरी जाणवायची. स्मिता दिसायला प्रतापइतकी नाजूक नव्हती. त्याच्यापेक्षा काकणभर काळीच आणि दणकट होती. तिला भीती म्हणून कशाचीही वाटत नसे. एखाद्या गेंड्यासारखी मुसंडी मारून पळायची, झाडावर चढायची. जपून कोणतीही गोष्ट करणं तिच्या कोशातच नव्हतं. मग सारखी पडायची. हातापायाला पट्टया, बँडेजं हा तिच्या पोशाखाचा भागच होता. रामने प्रतापला हवेत उडवलं की तो घाबरून किंचाळायचा. स्मिताला उडवलं की तिला मजा वाटायची. ती खिदळून रामला पुन्हा पुन्हा उडवायला लावायची. रामला मुलं लहान असताना त्यांच्याशी खेळायला आवडायचं. पण त्याचं खेळणं जरा धसमुसळंच असायचं आणि प्रतापला त्याची भीती वाटायची. पण त्याला भीती वाटते म्हणून त्याच्याशी जरा जपून खेळावं असं रामला कधी वाटलं नाही.
 तो म्हणायचा, “ त्यांना बनवताना देवाचा घोटाळाच झाला. त्यानं स्मिताला मुलगा करायला हवं होतं."
 " ती जशी आहेत तसं तू त्यांना का पत्करत नाहीस !"
  पण रामला त्यांच्याशी-विशेषत: प्रतापशी- कसं वागायच

१०८ : साथ