हे पान प्रमाणित केलेले आहे.

अमरचा अर्ज आला होता. अर्जातल्या तपशिलावरून आणि मुलाखतीनंतर शेकडो अर्जदारांतनं तो उठून दिसला होता. हुशार होता, उत्साही होता, बोलताना विनाकारण बुजरेपणा वगैरे न करता नीट सरळ डोळ्याला डोळा देऊन बोलत होता, आत्मविश्वासाने वागत होता. त्याला मराठी, इंग्रजी आणि थोडंसं कानडी येत होतं. हया क्षेत्रातला काही अनुभव नसूनसुद्धा रामने त्याला सहा महिने उमेदवारीवर नेमलं. पण त्यावेळीच त्याला माहीत होतं की अमरची काम करण्याची इच्छा असली तर त्याची कायम नेमणूक नक्की होती. इतका चांगला माणूस मागून मिळणार नव्हता.
 अमरने एक खोली भाड्याने घेतली. शेजारची एक बाई त्याला डबा पाठवायची. स्वतः करून खायच्या भानगडीत तो पडला नाही. स्टाफशी बरोबरीच्या नात्याने वागायचं नाही असा रामचा नियम होता, पण अमरचा अपवाद करून ज्योतीनं त्याला जेवायला बोलावलं. त्यांच्याकडे काम करणाऱ्या इतरांसारखा तो नाही हे लगेचच राम आणि ज्योतीला कळून चुकलं. त्याच्याशी गप्पा मारण्यात त्यांचा वेळ इतका मजेत गेला की ज्योती त्याला वारंवार बोलवायला लागली. त्याला म्हणण्यासारखं कुटुंब असं नव्हतंच. आईबाप लहानपणीच मरून गेले होते आणि एका चुलत्याकडून दुसऱ्याकडे असं करीत तो वाढला. ज्यांनी त्याला सांभाळलं त्यांनी ते केवळ कर्तव्यबुद्धीनंच केलं, त्याच्याबद्दल विशेष आच होती म्हणून नव्हे. आणि तो एकदा आपल्या पायावर उभा राहिल्यावर ते हात झटकून मोकळे झाले होते.
 स्मिताचं त्याच्याशी अगदी सूत जमलं. ती सुट्टीला घरी आली असताना तो तिला पत्त्याचे खेळ शिकवायचा, दिवाळीचे कंदील बनवून द्यायचा, जादूचे खेळ कसे करायचे ते दाखवायचा. एक वेळ अशी होती की ज्योती तो आपला जावई होऊन धंदा चालवायला घेईल अशी स्वप्नं पहात होती.
 प्रतापला मात्र अमर मुळीच आवडत नसे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं ते लपवण्याचे श्रम तो कधी घेत नसे.

साथ : १३१