हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच्याशी तुसडेपणाने वागायचाच, आणि त्याच्या पाठीमागे संधी मिळाली की त्याच्याबद्दल कुत्सितपणे बोलायचा. एकदा तो सुट्टीला आला असताना अमर आठवडाभर आला नाही तेव्हा तो म्हणाला, " तुमचा लाडका मुलगा कुठेय ? नाही, आठवडाभर दिसला नाही म्हणून विचारतोय."
 " तो कुठेय ह्याची खरंच तुला फिकिर असली तर तो टूरवर गेलाय."
 " तरीच. म्हटलं एक सबंध आठवडाभर फेरा इकडे कसा वळला नाही ? "
 " त्याच्या इथे येण्यानं तुझं काय बिघडतंय रे? "
 " आपल्या फॅमिली लाइफवर त्याचं अतिक्रमण होतं."
 " तुला फॅमिली लाइफबद्दल इतकी आस्था कधीपासून उत्पन्न झाली?"
 सुट्टीतला बराचसा काळ प्रताप कुठेतरी सहलीला जाणं, मित्रांकडे रहाणं वगैरेत खर्चायचा. घरी आलाच तरी बहुतेकदा एकटाच भटकायला जाई किंवा कोपऱ्यात वाचत बसे. बसून सगळ्यांबरोबर गप्पा मारल्या असं सहसा कधी करीत नसे. अर्थात एका परीने हे बरंच होतं कारण गप्पांतून राम आणि प्रतापचा कशावरून तरी वितंडवाद सुरू व्हायला वेळ लागत नसे. पण आहे ह्या परिस्थितीत त्याला फॅमिली लाइफबद्दल बोलायचा मात्र हक्क पोचत नव्हता.
 तो म्हणाला, " मला आस्था आहे की नाही हे तुला काय माहीत ? तू दिवसाचे तास दोन तास तर घरी असतेस. मग अमर असतोच आणि तुम्ही सगळे मिळून कामाबद्दलच बोलता. मग मला कशाबद्दल आस्था आहे ते कळून घ्यायला वेळ कधी असतो तुला?"
 " हा मात्र अन्याय आहे हं, प्रताप. तुला ज्यात रस आहे अशा कोणत्याही विषयावर बोलायला तुला कुणी मज्जाव केलाय का?"
 " कुणीतरी परका माणूस सदैव समोर असताना मला नाही मोकळेपणानं बोलावंसं वाटत."

१३२ : साथ