हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाड्याने घेतली. एका घरमालकाने गॅरेजमधे पार्टिशन्स घालून विद्यार्थ्यांना भाड्याने देण्यासाठी खोल्या बनवल्या होत्या त्यातली ही एक होती. खोलीला स्वतंत्र संडास तर नव्हताच, फक्त कोपऱ्यात एक लहानशी मोरी होती. त्यातही पाणी बादलीने भरून आणून ठेवावं लागे. सगळ्या चार खोल्यांना मिळून एक संडास आणि एक आंघोळीची खोली होती.
 ही मुलगी इतकी स्वतंत्र वृत्तीची आहे की घरी राहणं तिला जमणारच नाही हे एकदा ज्योतीने मान्य केल्यावर मग स्मिताची नवी खोली सजविण्यात तिने हिरिरीने भाग घेतला. तिनं एक स्टो, स्वैपाकाची भांडी, बश्या, कपबश्या, डबे असं खूपसं सामान घेतलं. मग फरशीवर टाकायला एक छोटासा हातमागाचा गालिचा आणि बिछान्यावर पसरायला एक ठळक रंगांचा पलंगपोस घेतला. दाराला आणि एकाच खिडकीला पडदे करण्यासाठी कापड घेतलं. शेवटी स्मिता म्हणाली, " आता बास हं ममी ! आणखी मी काहीही तुझ्याकडून घेणार नाही. ह्यापुढे रिकाम्या हाताने आलीस तरच तुला इथे प्रवेश मिळेल."
 पुढच्या खेपेला ज्योती गेली तेव्हा स्मिता म्हणाली, " हात बघू तुझे."
 " फक्त हलवा आणलाय तुला आवडतो म्हणून. घरी केला होता आज."
 " तुझ्यापुढे हात जोडले बाई."
  " खाऊन बघ ना."
 " मग खाईन. आता भूक नाहीये मला. ठेव तिथे."
 काही दिवसांनी स्मिताने डबा परत आणून दिला तेव्हा हलवायाकडून विकत आणलेली मिठाई त्यात होती.
 " हे काय स्मिता? काहीतरी परत आणून द्यायला पाहिजे का?"
 " का नाही ? असा काही नियम आहे का की मुलांनी आईबापांकडून सारखं घ्यावं पण त्यांना कधी काही देऊ नये?"
 स्मिताचा युक्तिवाद बिनतोड होता, पण तरी का कुणास

[१०]

साथ: १४५