हे पान प्रमाणित केलेले आहे.

साजरे केले जायचे. त्या दिवशी वस्तीवरच्या, शेतावरच्या आणि कारखान्यातल्या कामगारांच्या मुलांना खाऊ वाटायचा कार्यक्रम असे. रात्री आतषबाजी, आणि मग मोठी मेजवानी. एकूण ते एक प्रस्थच असायचं. कृष्णा रामला म्हणाला, " तुम्ही एखाद्या मोठ्या जमीनदारासारखं वागताय की.” पण तो सगळ्या मुलांच्यात रमून गेला आणि त्यांना चित्रं काढून दाखवून, नकला करून, निरनिराळ्या जनावरांचे आवाज काढून त्याने खूप मजा आणली. तेव्हापासून तो दर वाढदिवसाला आवर्जून हजर राहायचा.
 त्याचं लग्न झालं नव्हतं आणि ज्योतीनं त्याला एकदा असं का म्हणून विचारलं तर तो म्हणाला, " मी नेहमी प्रस्थापिताविरुद्ध लढा देत असतो तेव्हा सरकार माझ्यावर चिडलं तर त्याचा प्रसाद माझ्या कुटुंबाला मिळू नये म्हणून मी एकटंच राहिलेलं बरं." राम म्हणाला, " काहीतरी बडबडतो हा. कोण त्याला त्रास द्यायला बसलंय ? त्याला उगीचच अतिशयोक्ती करायची सवय आहे."
 आणि मग आणीबाणी जाहीर झाली आणि हिंदुस्थानात कधी घडणं शक्य नाही अशा वाटणाऱ्या घटना घडायला लागल्या. कृष्णाला अटक काही झाली नाही. तो महत्त्वाचा राजकारणी नव्हता, आणि तो मराठी वर्तमानपत्रात लिहायचा म्हणून दिल्लीत तो फारसा धोकादायक वाटत नव्हता. शिवाय त्याचे राजकारणावरचे लेख आणि व्यंगचित्रं छापायला बंदीच असल्यामुळे तो सत्ताधाऱ्यांना फारसा उपद्रव देऊ शकत नसे. पण तो आता त्यांना भेटायला येत नसे. ज्योती आणि रामनं उडत उडत ऐकलं की तो एका भूमिगत संघटनेत काम करतो. ते वस्तुस्थितीबद्दल पत्रक छापून वाटत असत आणि तुरुंगात टाकलेल्यांच्या कुटुंबियांसाठी मदत जमवत. रामचं अजूनही मत होतं की हे लोक उगीचच नाटयमय, थरारक वातावरण निर्माण करताहेत.
 ज्योती म्हणाली, " त्याला जे पटतं ते तो करतोय. तुला त्याच्यावर टीका करायचा काय हक्क आहे ?"
 " ही पत्रकं वाटून काय साधणार आहे ?"

साथ : १४७