हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्यावर प्रेम आहे. शेवटी प्रेम म्हणजे काय? आपण ज्याचा आधार घेतो किंवा जो आपला आधार घेतो त्याच्याबद्दलची आपली भावना ? की जो स्वतःच्या ऊर्मी दाबून ठेवून आपल्या मनाप्रमाणे वागतो त्याच्याबद्दल वाटतं ते ? ज्याला तुमच्याबद्दल प्रेम वाटतं त्यानं न सांगता तुमच्या भावना, तुमच्या गरजा जाणायला नकोत ?"
 " असं नेहमीच होत नाही, ज्यो. तुमच्या गरजा तुम्हाला सांगाव्या लागतात. तितकं संवेदनाशील कोण असतं? पुरुष तर नाहीच, कारण त्याला केंद्रबिंदू होऊन राहण्याची सवय असते, दुसऱ्याने त्याच्या गरजा जाणून घ्यायची धडपड करण्याची सवय असते. कधी कधी मी हिरमुसलेली पाह्यली की अतुल म्हणतो, काय झालंय तुला? मग मी म्हटलं की तू अमुक केलंस म्हणून किंवा करायला विसरलास म्हणून मला वाईट वाटलं. तर तो म्हणतो, तू सांगितलं का नाहीस मला? मी बोलून दाखवीपर्यंत त्यानं मला दुखवण्यासारखं काही केलंय याची जाणीवच नसते त्याला."
 " तरी पण त्यानं तुला दुखवलंय ही वस्तुस्थिती बदलत नाही ना? उलट अजाणता केलं तर ते जास्तच वाईट. तुझ्याबरोबर इतकी वर्ष काढल्यावर तू कशाने दुखवली जातेस हे जाणण्याचे सुद्धा कष्ट त्यानं घेतले नाहीत, तर त्याचा अर्थ काय होतो? त्याला तुझ्या बद्दल काही आच नाही असाच ना?"
 विनया बराच वेळ ज्योतीकडे बघत राहिली. मग हळूहळू म्हणाली, " तुझं खरं असेलही. पण असली समीकरणं मांडत बसण्याचा काही फायदा नसतो. व्यवहारात इतका काटेकोरपणा करताच येत नाही. मला अजूनही वाटतं की तू फार घाई करत्येयस. रामला त्याची बाजू मांडण्याची संधीसुद्धा देत नाहीयेस. पिंजऱ्यात उभ्या असलेल्या आरोपीलासुद्धा त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिक्षा फर्मावीत नाहीत."
 जाता जाता विनी म्हणाली, " तू आणि राम - माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आयुष्यात जे शाश्वत समजावं त्यालाच

साथ: १६३