हे पान प्रमाणित केलेले आहे.

माहेराकडून पैसे कसे उकळायचे असं अनेक पुरुष पहात असताना ह्याने त्यांना मदत करण्याची भाषा करावी, ह्याचं ज्योतीला फार कौतुक वाटलं. दुर्दैवाने उपकारकर्त्याबद्दल बरेचदा असते त्याप्रमाणे ज्योतीच्या आईच्या मनात रामविषयी अढीच निर्माण झाली.
 तसं पाहिलं तर रामविषयी तिला पहिल्यापासूनच संशय वाटत आला होता. त्याच्यासारख्या सुस्थितीतल्या माणसानं ज्योतीसारख्या रूप, पैसा, जमीनजुमला, उच्चपदस्थ नातेवाईक ह्यांपैकी काहीच नसलेल्या मुलीशी लग्न का करावं ? त्याच्यात काहीतरी उणं असलंच पाहिजे. तो कदाचित नपुंसक असेल किंवा त्याला महारोग झाला असेल अशा शंकासुद्धा तिनं बोलून दाखवल्या होत्या. मग पुढे राममधे काही चूक नाही, तो चार माणसांसारखा आहे हे कळून चुकल्यावर तिनं असं ठरवलं की आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या खालच्या पातळीवर असलेल्या कुटुंबाशी त्याने संबंध जोडला कारण त्यांचा पदोपदी अपमान करण्यात त्याला विकृत आनंद मिळत होता. असली अफलातून कल्पना तिची आई सोडून दुसऱ्या कुणाला सुचली नसती अशी ज्योतीची खात्री होती.
 लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला त्यांच्याकडं जायचं आमंत्रण जेव्हा रामनं स्वीकारलं नाही तेव्हा ज्योतीच्या आईनं लिहिलं होतं, " बरोबरच आहे. तुम्ही मोठे लोक, आमच्या गरिबाघरच्या दिवाळीचं तुम्हाला काय कौतुक ?" काही काळानंतर गाठ पडली तेव्हा ज्योतीनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तशी तिची आई म्हणाली, " उगाच तोंडची वाफ कशाला दवडतेस? तुझं त्याच्याशी लग्न झालंय तेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीचं तू समर्थन करणारच. पण तो का आला नाही हे तुला माहीत आहे नि मला माहीत आहे. तेव्हा खोटं बोलायचे श्रम तू घेऊच नयेस."
  अर्थात एका बाजूने आईचा हा पवित्रा, तर दुसऱ्या बाजूने रामचं वागणं काही ज्योतीची वाट जास्त सुकर करीत नव्हतं. त्याला लोकांशी कसं वागायचं ही कला नव्हती, आणि ती शिकण्याची इच्छाही नव्हती. तो नेहमी फटकून वागत असल्यामुळे

७८: साथ