पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/143

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आईची छाती कोरडी पडते या रूढीग्रस्ततेला काय म्हणणार? किंवा मुलगी झाली या तणावात ते अर्भक आईच्या किती प्रकारच्या अत्याचारांना बळी पडते? मी महिला आधारगृह चालववित असताना बलात्कारित, अत्याचारित महिला सोडा; सर्वसाधारण आईपण मुलगी झाली म्हणून आपल्या अंगाखाली आपल्या पोटच्या गोळ्याला चिरडताना, मारताना मी पाहिले आहे. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. मूल आपादग्रस्त असणे (अपंग, मतिमंद इ.) मी समजू शकतो; पण संशयाचा बळी म्हणून जन्मलेल्या मुलांची न दिसणारी उपेक्षा मी पाहतो, अनुभवतो, तेव्हा भारतीय पुरुषी अहंकार व मानसिकतेची कीव करावीशी वाटते.
अमानवी व्यापार (Child trafficaing)  मुला-मुलींचा अमानवी व्यापारात वापर ही जगातील सर्वाधिक गंभीर बालक समस्या होय. यात मुली, तरुणींचा वापर मोठा होतो. बालकांचा व्यावसायिक गैरवापर हा बालक हक्कांचे उल्लंघन, मानव अधिकारांचा संकोच व बालशोषण अशा विविध पद्धतींनी या अत्याचारांकडे पाहिले गेले पाहिजे. शिवाय विविध कायद्यांचे उल्लंघन करणारी घटना म्हणून ते गैर व शिक्षापात्र आहे, हेपण आपण लक्षात घेतले पाहिजे. वाहतूक, स्थानांतरण, देवाणघेवाण, भ्रष्टाचार, गैरवापर असे या अत्याचारांचे वैविध्य आहे. यात मुलांवर होणारी सक्ती, अत्याचार, गुलामीकरण, वेठबिगारी ही अधिक गंभीर स्वरूपाची असते.
 सन २००५ च्या राष्ट्रीय अपराध नोंद अहवालानुसार (Nation crime Report) १८ वर्षांखालील मुला-मुलींवरील अत्याचारांची संख्या एकूण अपराधांत ६०टक्के इतकी मोठी आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या गेल्या शतकातील अंतिम दशकात केवळ लैंगिक शोषणास बळी ठरलेल्या बालकांची संख्या ७0,000 होती. यावरून आपल्या देशातील बालक अत्याचार हा देश व समाजासाठी चिंता व चिंतनाचा विषय व्हायला हवा; पण त्यापेक्षा अधिक आपण सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय व कृती कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करायला हवे. एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार आशिया खंडात बाललैंगिक शोषण जगात अधिक असून एकूण लैंगिक शोषणात बाललैंगिक शोषण २0टक्के इतके मोठे आहे. लैंगिक व्यापार व शोषणार्थ मुलींची विक्री व त्यांचे स्थानांतरणाचे (एका देशातून दुस-या देशात) प्रमाणही मोठे आहे. अल्पवयीन वेश्यांचे संगोपन व संरक्षण कार्याच्या सन १९८५ ते ९० या काळात या मुलींचे जीवन, दिनक्रम, सवयी मी पाहिल्या, अनुभवल्या आहेत. त्या सवयीच्या इतक्या गुलाम असतात की, व्यवसायाच्या

    सामाजिक विकासवेध/१४२