पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निढळाच्या घामानं स्वावलंबी, सुखी व्हायचंय! राजा मिडास होऊन जीवनाचा कांचनमृग करून घ्यायचा आहे की कस्तुरीमृगाची धुंदी लेवून आत्मगंधाचा, आत्मिक वृत्तीचा माझ्यात काय आहे... काय नाही हे न्याहाळत, सिंहावलोकन करीत जीवनावर मांड ठोकायची आहे?
 स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात सापडलेली पिढीही मला अस्वस्थ करीत राहते. जागा तीनशे. विद्यार्थी बसतात तीन लाख. यूपीएससीसाठी आपली मुलं दिल्ली, पुणे, डेहराडूनला ठेवणारे पालक मी पाहतो. मुलांवर अक्षरशः हजारो रुपये खर्च करतात, तेही वर्षानुवर्षे, एज बार होईपर्यंत. असं नाही का करता येणार की, दोन-तीन वर्षे संधी द्यायची अन् त्याला म्हणायचं आता तू नोकरी करीत करिअर कर. होतं असं की, दिल्लीत राहायला चाललेला मुलगा, मुलगी त्याला गावाकडे अपयश घेऊन येणं कमीपणाचं वाटू लागतं. कष्ट करणा-या आई-वडिलांवर कृतघ्नपणे डाफरणारी मुलं जनतेची कोणती नि कशी सेवा करणार ?

 पालकांनी मुलांना स्वप्नं जरूर द्यावी; पण काळ, काम, वेगाचे संस्कारही द्यायला हवेत. लातूर पॅटर्नमध्येही हजारो मुलं-पालक असेच ‘घाशीराम' होतात. या वर्षी तो फुगा फुटला. वाय.डी. घेऊन करिअर होत नसते हे मुला-पालकांना समजवायची वेळ येऊन ठेपली आहे. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्चरना आपली मुलं बस्तान बसलेल्या धंद्यात यावी असं वाटण्यात गैर काहीच नाही. प्रश्न असतो मुला-मुलींच्या क्षमता व वकुबाचा. अपेक्षांचं ओझं तर आपण आपल्या मुलांवर लादत नाही ना ? माझ्या मोठ्या मुलाला आर्किटेक्ट व्हायचं होतं. बारावी सायन्स झाला. ७५टक्के गुण होते. प्रयत्न केले. मिळाला नाही प्रवेश, देणगी मला भरायची नव्हती. मुलानेच पर्याय निवडला. साइड बदलली. कॉमर्सला गेला. बी. कॉम. करीत सी.ए. इंटर झाला. सी. ए. पूर्ण न करताही कर सल्लागार, गुंतवणूक सल्लागार होऊन स्वावलंबी. गाडी, घोडे (पत्नी) स्वत:चं स्वतः घेऊन आनंदी ! खलील जिब्राननी ‘प्रोफेट' या आपल्या महाकाव्यात म्हटलेलं अधिक महत्त्वाचं नि मार्गदर्शक आहे. तो म्हणतो, “तुम्ही तुमच्या मुलांना तुमचे प्रेम द्या; पण आपले विचार मात्र देऊ नका; कारण त्यांना स्वत:चे विचार नि स्वप्नं असतात.

सामाजिक विकासवेध/२०