पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/27

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यंदा कर्तव्य आहे; पण...

 ‘विवाह' शब्दाचा पर्याय ‘कर्तव्य’ केव्हा झाला मला माहित नाही पण हा शब्द मला आवडला खरा. किंकर्तव्यमूढच्या द्वंद्वातून तो आला असावा. ‘करू की नको' असं द्वंद्व विवाहाच्या संदर्भात सा-यांनाच असतं. ज्यांचा विवाह असतो त्यांना..., ज्यांना आपल्या पाल्यांचे विवाह करायचे असतात त्या पालकांना, विवाहाची मध्यस्थी करणाच्या काका, मामांना; पण असं द्वंद्व विवाहसूचक मंडळाच्या संचालकांत मात्र खचीतच नसतं. त्यांची मन:स्थितीच वेगळी असते. ती थोडीशी भटा-ब्राह्मणासारखी असते. नवरा मरो की नवरी; दक्षिणा मिळाल्याशी कर्तव्य ! कमिशन मिळालं की हे झाले मोकळे... आपल्या काखा वर करायला. प्रत्यक्ष ज्यांचा विवाह असतो त्यांची मन:स्थिती मात्र बळी जाणाच्या बकरी किंवा बोकडासारखी असते. विवाह त्यांच्या जिवाचा, आयुष्याचा खेळ असतो. तो असतो जुगार. जे विवाह ठरवतात ते बहुधा वधू-वरांना वधस्तंभाकडे नेत असतात. वधू-वरांचे चेहरे पाहिले की ते लक्षात येतं. वधूचा चेहरा मोले घातले रडाया... वर महाराजांचा आविर्भाव युद्ध, शिकारीवर निघाल्यासारख ... पाहुणे-रावळे यांना कशाचं काही देणं-घेणं नसतं... पंगत उठली की झाले रिकामे कपड्याला हात पुसून नावं ठेवायला. भाजीत मीठच जास्त होतं, भात जरा कच्चाच होता, उरकलं एकदाचं लग्न, मानपान काय केलं? आम्ही आमच्याकडच्या लग्नात असा फडतूस आहेर बलुतेदारांनापण नाही करत. अख्ख्या लग्नात पाहुणे खरेच पाहुणे असतात. पुरुष हाताची घडी घालून, तर बायका कमरेवर हात ठेवून मापं काढण्यात गढलेले. नाही म्हणायला ज्यांच्या मुला-मुलींची लग्नं तोंडावर आलेली असतात त्यांची लगबग मात्र मांडव, कार्यालयात थोडी उत्साही असते खरी. अंतस्थ हेतू तो न्यारा! आपण हालचाल केली नाही तर स्थळ हातून जाईल म्हणून

सामाजिक विकासवेध/२६