पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/61

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अवास्तव मागण्या करू नका. त्यांच्या प्रलोभनास बळी पडू नका. अमान्यता हे मोठे सामाजिक हत्यार आहे. त्याचा विवेकी वापर करा. जनलोकपाल विधेयकाचा आग्रह धरा; पण संसदेपेक्षा कोणी मोठा नाही हे घटनात्मक तथ्य विसरू नका. मी म्हणेन ती पूर्व असं लोकशाहीत असत नाही. बदल सावकाशीने होतात, ही लोकशाहीची रीत मान्य करा. रात्रीत बदलाची अपेक्षा केवळ हुकूमशाहीतच करता येते. भावनेने प्रतिक्रिया व्यक्त करणे थांबवून विचारपूर्वक प्रतिसादाचे पथ्य जनतेने पाळायला हवे. हिंसा वयं मानायलाच हवी. बंद, हरताळात सार्वजनिक तोडफोड म्हणजे आपल्याच पायावर कु-हाड मारून घेणे, हे एकदा जाणतेपणाने समजून घ्यायला हवे. “मी कर भरणार नाही' म्हणण्यापेक्षा कर भरीन' पण हिशेबाचा आग्रह धरीन, म्हणणे अधिक प्रगल्भ व जबाबदार व्यवस्था निर्माण करण्याचा मार्ग. परपीडेपेक्षा आत्मक्लेश प्रभावी हत्यार आहे, हे महात्मा गांधी वाचून कळत नसते. गांधी हा आचार आहे, विचार नंतर !

 जॉर्ज कॉनरॅडचं एक सुंदर पुस्तक आहे, ‘अँटी पॉलिटिक्स : अॅन एसे' नावाचं. त्याचा शेवट त्याने पुढील अवतरणाने केलेला आहे. माझ्या या लेखाच्या उपसंहाराला त्यासारखे प्रभावी विधान आठवत नाही. त्यांनी लिहिलंय, “हे खरं आहे की मी थोरांपुढे छोटा, शक्तिमानांपुढे दुर्बल, हिंसकापुढे भित्रा, आक्रमकांपुढे पलायनवादी ठरत नगण्य होऊन जातो. माझ्या मूल्य व विवेकापेक्षा भोवतालचं साकाळलेलं विश्व विशाल नि माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, हेही खरं आहे. कधी-कधी तर मला ते अटळ, अमर्त्य नि अपरिवर्तनीय वाटतं; पण तरीही त्या व्यवस्थेपुढे मी दुसरा गाल पुढे करीत नाही. मी गलोरीतून साधा खडाही मारीत नाही. मी व्यवस्थेकडे एक कटाक्ष टाकतो अन् माझं सारं शब्दसामर्थ्य एकवटून विरोध करतो, नोंदवतो." टोकाचा संयम, शिस्त, सभ्यतेस आपल्या समाजजीवनास बुळे समजले जाणे यातच आपल्या पराभवाची कबर खोदलेली असते. ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा'चा मथितार्थ आपणास केव्हा उमजणार?' 'उष:काल होता होता काळ रात्र झाली, अरे, आयुष्याच्या आता पुन्हा पेटवा मशाली'मधले कवी सुरेश भट काय सांगतात हे आपण समजून घेणार नसू तर आपल्यासारखे दुसरे करंटे कोण ? ‘एकला चलो रे' म्हणणारे कवी रवींद्रनाथ, आचार्य विनोबा भावे काय वेडे होते ? प्रवाहाविरुद्ध पोहचणारा वीर नदीत अपवादानेच दिसतो ना? ‘पेरते व्हा !' चा संदेश काय? बोलके सुधारक नकोत. कार्यकर्ते हवेत. दुस-यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण कराल तर समाजातील दोष लवकर व अधिक

सामाजिक विकासवेध/६०