पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/76

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक रक्तसंबंधांचा धागा सोडला तर इथं सारं कुटुंबासारखं असतं. जन्म, बारसं, संगोपन, शिक्षण, विवाह, माहेरपण, बाळंतपण, दिवाळसण, सारे सण समारंभ अन् हे सारं कुणाचं कोण नसताना मोठ्या गुण्यागोविंदानं चाललेलं असतं.
 माझा जन्म अशा एकात्मिक, संस्थात्मक कुटुंबात झाला. मी अशा संस्थात्मक कुटुंबात राहत मोठा झालो. शिकलो, सवरलो, सावरलोही. पुढे कळत्या वयात अशा संस्थांच्या विकासाचे काम करीत राहिलो. आताही करतो; पण पूर्वीसारखं पूर्णवेळ नाही. त्यामुळे जन्मापासून ते आत्तापर्यंतचा माझा प्रवास कोणीच, काहीच नसलेली एक व्यक्ती ते आत्ता सर्व नाती असलेला व सर्वकाही असलेला समाजमान्य माणूस... असा प्रवास थोड्याफार फरकाने या कुटुंबातील सर्वांचाच राहतो. काळ वेगळा, कारणं वेगळी, संबंध वेगळे; पण हे कुटुंब वर्षानुवर्षे नसलेल्यांना आपलं करून सांभाळतं. मुलगी सुस्थळी द्यावी तसं समाजात प्रत्येकाचं पुनर्वसन कसं होईल, तो समाजाच्या मध्य प्रवाहात सामील होऊन अन्य सर्वसाधारण कुटुंबातील माणसासारखा होऊन संस्थेचा त्यावरील शिक्का पुसून कसा जाईल हे पाहतं. अशा संस्थात्मक कुटुंबांची स्थापना वेगळ्या कारण, गरजांनी झालेली असल्यानं यातील प्रत्येक कुटुंबांचे स्वरूप, कार्यपद्धती, नातेसंबंध वेगवेगळे असतात.
अर्भकालय

 इथं एक दिवसाच्या बाळापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे संगोपन होतं. समाजात कुमारी मातांची मुलं, शिवाय टाकलेली, सोडलेली, हरवलेली मुलं असतात. ती कधी संस्थेत जन्मतात, कधी कुमारी माता आणून देते तर कधी टाकलेली, सापडलेली, हरवलेली मुलं पोलीस आणतात. अशा संस्थांमध्ये त्यांच्या संगोपनाची सर्व व्यवस्था असते. पाळणे, खेळणी, भोजन, दूध, औषधं, कपडालत्ता, मनोरंजनाची साधनं सारं असतं. सांभाळायला दाया, नर्स, डॉक्टर असतात. त्या दाया, नर्स, डॉक्टर त्यांच्या आई, मावशी, काकी, काका, ताई होतात. मुलं-मुली एकमेकांचे भाऊ-बहीण. रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळी, दहीहंडी सारं असतं. नसतात फक्त जन्मदाते आईबाबा. ते समाजाने निर्माण केलेल्या नात्यांच्या भिंती व भीतीमुळे भूमिगत असतात, होतात. युरोपात जसं कुमारी मातेस आपल्या बाळाला घेऊन सन्मानाने जगता येतं, त्यासाठी सर्व सुविधा, सवलती, आधार, अर्थबल असतं, तसं आपणाकडेही असायला हवं. नैतिकतेच्या दुराग्रहामुळे आपण आई-मुलाची ताटातूट करतो, हे आपल्या लक्षात येत नाही.

सामाजिक विकासवेध/७५