पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आड येत असेल तर मला सांगा. सगळा संकोच, सगळी लाजलज्जा सोडून ती आपण होऊन तुमच्या कंठात मिठी घालील असे करतो. तुम्ही पहात रहा. ...'
 मदनाचे हे भाषण ऐकून 'को व्हॅडिस' कादंबरीतील पेट्रोनियसच्या भाषणाची वाचकांना आठवण होईल. प्लॅटियसची स्त्री पांपोनिया हिचे पातिव्रत्य ही त्याला मार्गातली अडचण वाटत होती. धन, ऐश्वर्य, सत्ता, रूप, सौंदर्य, यांनी जगात काय वाटेल ते मिळविता येइल अशी धुंदी त्यावेळी रोमन लोकांना चढली होती. तीच मदांधता तारकासुराच्या काळी देवसमाजाला आली होती. ते पराकाष्ठेचे भोग विलासी झाले होते. त्यामुळेच इंद्राचे वज्र, यमाचा दण्ड, वरुणाचा पाश ही सर्व आयुधे निष्फळ ठरत होती. त्यांच्यातील सत्त्व नष्ट झाले होते. शंकरपार्वतीचा पुत्रच तुम्हांला यातून तारील असे ब्रह्मदेवाने सांगितल्यावरही त्यांचे डोळे उघडले नाहीत. शंकराची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्यावे असे त्यांच्या मनातही आले नाही. पार्वती हे 'सुकुमार प्रहरण' त्याच्यावर फेकून त्याला सहज जिंकता येईल असाच इन्द्राचा समज होता. म्हणून त्याने तपाचा मार्ग न अनुसरता मदनाची त्याकामी योजना केली.
 मदनाने त्या अन्वये एक दिवस पार्वती शंकराची पूजा करीत असताना तिच्या ठायी असे भाव निर्माण केले की क्षणभर शंकरहि चलचित्त झाले. पण दुसऱ्याच क्षणी ते सावध झाले व आपल्यावर आघात करणारा शत्रू कोण ते दिसताच तृतीय नेत्र उघडून त्यातील प्रखर ज्वालेने त्याचे भस्म करून टाकले.
 पार्वतीला या सर्व प्रकाराने अत्यंत लज्जा उत्पन्न झाली. आपले रूप, आपले सौंदर्य, आपला शृंगार हे सर्व व्यर्थ आहे. शिवाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग हा नव्हे, हे तिने जागले आणि तपश्चर्या करण्याचा निश्चय करून ती निघून गेली.
 ३ ध्येय आणि संसार वा. म. जोशी हे मानसशास्त्राचे प्राध्यापक-अध्यात्मशास्त्र, नीतीशास्त्र यांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला. हे विषय शिकविणारे अनेक प्राध्यापक प्रत्येक विद्यापीठात असतातच. पण त्यांचा विषय व त्यांचे जीवन यांचा प्रत्यक्षात फारसा संबंध येत नाही. वामनरावांचे तसे नव्हते. या शास्त्रातील सिद्धान्तांनी, विशेषतः त्यांतील मूल्य चिकित्सेने, त्यांचे जीवन भरून गेले होते. त्यांच्या मनात मुल्य चिकित्सा इतकी पराकोटीला गेली होती की, दोन मूल्यांतील श्रेष्ठ मूल्य कोणते याचा निर्णय देण्याची त्यांच्या ठायी शक्तीच पुढे पुढे राहिली नव्हती, असे म्हणतात. त्यांचे मित्र व लोकही त्यांना संशयात्मा म्हणत. अशा या तत्त्ववेत्त्याच्या साहित्यात मूल्यांचा संघर्ष न दिसेल तरच नवल. आरंभी सांगितलेच आहे की, कोणतीही ललितकृती घेतली तरी तीत मूल्यसंघर्ष कोठे ना कोठे असतोच. कारण मानवी जीवनातच तो निरपवादपणे आलेला असतो. पण वामनरावांनी आपल्या कादंबऱ्यांचा प्रधान विषय म्हणूनच तो निवडलेला आहे. 'रागिणी' व 'इन्दु काळे आणि सरला भोळे' या कादंबऱ्यांत तरी निश्चितपणे तो

मूल्य संघर्ष
१०१