पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुवाद करून ग्रीनने 'विषय' या गुणांचे आणखी स्पष्टीकरण केले आहे. तो म्हणतो, 'केवळ विषयावर कलेचे श्रेष्ठत्व अवलंबून नाही. त्यातील जीवन भाष्यावर अवलंबून आहे. त्या गुणाला महत्त्व आहे.' अर्थात पेटरने विषय शब्द वापरला तेव्हा त्याच्या मनात हाच भावार्थ होता. आणि तशा अर्थाने विषयालाच अनन्यसाधारण महत्व आहे हे ग्रीनला मान्य आहे. कारण विषय जेव्हा गहनगंभीर, व्यापक आणि मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात तेव्हाच साहित्यिकाला मूलगामी असे जीवनभाष्य करता येते. हे सांगून शेवटी तो म्हणतो, 'सर्व जगाला वंद्य झालेल्या कलाकृतीत निरपवादपणे मानवाला जिव्हारी लागलेल्या धार्मिक व सामाजिक अनुभूतींचा अर्थ विशद केलेला आढळतो, आणि अंतिम मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घटना व वस्तू यांवर भाष्य असते हा काही केवळ योगायोग नव्हे. त्या भाष्यामुळेच त्या कृती वंद्य झालेल्या असतात. चित्र, शिल्प, संगीत, साहित्य कोणतीही कला घ्या. श्रेष्ठ कलाकार एकाच गुणाने श्रेष्ठ ठरलेला दिसतो. त्याने निवडलेल्या विषयाचे महत्त्व व त्या विषयावर त्याने केलेले प्रभावी भाष्य. पाश्चिमात्य संस्कृतीतील सुप्रसिद्ध चित्रे, शिल्पे, गीते घ्या. किंवा महाकाव्ये, शोकांतिका, कादंबऱ्या घ्या त्या सर्वांवरून हेच दिसून येईल. कलाकाराचा व्यापक दृष्टिकोण व त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान हाच कलेचा आत्मा असतो.'
 याच संदर्भात 'जीवनविषयक तत्त्वज्ञान' याचा भावार्थ ग्रीनने विल्यम जेम्सच्या आधारे स्पष्ट केला आहे. (दि आर्टस् अँड आर्ट ऑफ क्रिटिसिझम- प्रकरण २४, पृ. ४६१–६६.)
 एमिल झोला याच्या ट्रूथ या कादंबरीचे श्रेष्ठत्व कशात आहे हे वरील विवरणा- वरून कळून येईल, धर्म, राजकारण, लोकसत्ता, शिक्षण, विवाह, स्त्रीपुरुष-नीती, न्यायदान, सत्य, ध्येयवाद, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयांचे, तत्त्वांचे अर्थ, म्हणजे त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्याने या कादंबरीत आविष्कृत केले आहे. आणि मानवी व्यक्ती, त्यांच्या भावना, रागद्वेष, त्यांचे वात्सल्य, प्रेम, स्वार्थ, लोभ, त्याग, दया, क्षमा या माध्यमातून केले आहे. कला सौंदर्याचे सर्व गुण त्यात आहेतच, शिवाय उद्बोधन, जीवनदर्शन, क्रान्तिप्रवणता, अमर आशावाद, उदात्त ध्येयवाद, हेही आहे. श्रेष्ठ, अभिजात, अमर कलाकृती कोणती ? "जिच्यामुळे आपल्या भावना हेलावतात, चित्त गद्गदते आणि जिच्यात व्यापक, अंतर्भेदी दिव्य तत्त्वज्ञान, आढळून येते ती." ही ग्रीनची व्याख्या झोलाने सार्थ केली आहे यात शंका नाही.
 भारतातील शेतकरी मुनशी प्रेमचंद यांनी गोदान या आपल्या कादंबरीत भारतातील शेतकऱ्याच्या जीवनाचे दर्शन घडविले आहे. भारतातील शेतकरी. हा कायमचा दरिद्री, दीनवाणा, कायमचा कर्जात बुडालेला, अज्ञानपंकात पिढयान्-पिढ्या रुतलेला, लाचार आणि सुखहीन वैराण जीवन जगणारा असा आहे, हे प्रसिद्धच

४४
साहित्यातील जीवनभाष्य