पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्दिष्ट ठेवतोच असे नाही. आणि तसे उद्दिष्ट त्याच्यापुढे असले तरी ते दर्शन तो व्यक्तीच्या स्वभावरेखांच्या द्वारांच घडवीत असतो. ते घडविताना त्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रेरणा, त्यांची जीवनमूल्ये व त्यांचे वर्तन यांची मीमांसा साहित्यिकाला करावीच लागते. ध्येयवाद, उपयुक्ततावाद, स्त्रीप्रेम, अपत्यप्रेम, महत्त्वाकांक्षा, न्यायबुध्दी, धनमद, सत्तामद, प्रवृत्ती, निवृती, विवेक, अविवेक, लोभ, त्याग, स्वार्थ, परार्थ, इ. अनंत मूल्ये व्यक्तीला प्रेरित करीत असतात. ललित लेखक व्यक्तिदर्शन घडवितो त्यावेळी या प्रेरणांची गुंतागुंत तो उकलून दाखवितो. तसे केल्यानेच व्यक्तीचे खरे दर्शन घडते व तिच्या जीवनाचे रहस्य उलगडते.
 वैयक्तिक दृष्टिकोण ललित लेखक हे जे जीवनभाष्य करतो ते केवळ स्वतःच्या दृष्टिकोणातून करीत असतो. शास्त्रातील जीवनभाष्याप्रमाणे सर्वागीण, साधार, सप्रमाण भाष्य तो करीत नाही. ते त्याच्या कक्षेत येतच नाही. आणि वैयक्तिक दृष्टिकोणातून केलेल्या भाष्यामुळेच साहित्याला साहित्यत्व येते, गोडी येते. आत्माविष्कार हा एक साहित्याचा फार मोठा गुण अलिकडे मानण्यात येतो. तो आत्माविष्कार या जीवनभाष्यातून होत असतो. कवीच्या स्वतःच्या जीवनातील प्रसंगांचा, घडामोडींचा, त्याच्या आप्तेष्टांशी असलेल्या संबंधांचा आविष्कार म्हणजे आत्माविष्कार, असा एक अत्यंत भ्रांत व असमंजस अर्थ अनेक लोक करतात. पण तो अगदी त्याज्य होय. वर जी समाजजीवनातील व व्यक्तिजीवनातील समता, विषमता, प्रवृत्ती, निवृत्ती, ध्येयवाद, उपयुक्ततावाद, स्त्रीप्रेम, अपत्यप्रेम, जातिभेद, अस्पृश्यता, इ. तत्त्वे सांगितली, रुढी सांगितल्या त्यांविषयी लेखकाची काही मते निश्चित झालेली असतात. त्याचे काही विचार असतात. त्याच्या भावना, त्याची बुद्धि, त्याच्या अंतःप्रेरणा या सर्वांचे त्याच्यावर परिणाम झालेले असतात. या सर्वांचा एक परिपाक होऊन कवीचा दृष्टिकोण तयार झालेला असतो. त्याचे जीवनविषयक तत्वज्ञान बनलेले असते. आणि त्याच्या साहित्यात त्याचा पावलोपावली आविष्कार होतो. हा आविष्कार करताना कळत वा नकळत, बहुधा नकळतच, तो जीवनभाष्य किंवा संसृतिटीका करीत असतो. साहित्यातील संसृतिटीका अशी वैयक्तिक स्वरुपाची असते. आणि ती तशीच असणे युक्त आहे.
 संसाराचा अर्थ जॉन ड्यूई हा जसा मोठा तत्त्ववेत्ता व शिक्षण शास्त्रज्ञ आहे तसाच तो साहित्यशास्त्रज्ञही आहे. कलासमीक्षकही आहे. आपल्या 'आर्ट ॲज् एक्सपीरियन्स' या ग्रंथात त्याने आत्माविष्कार म्हणजे जीवनभाष्य होय हा विचार स्पष्ट करून मांडला आहे. 'दि ॲक्ट ऑफ एक्सप्रेशन' या प्रकरणात तो म्हणतो की, 'मनातील विकार, भावना यांचे केवळ प्रकटीकरण म्हणजे कलेतील आत्माविष्कार नव्हे. मनातील भावना, अनुभूती, विकार यांचा चिंतनपूर्वक केलेला आविष्कार म्हणजे आत्माविष्कार होय. भावदर्शन हे आत्माविष्काराला अवश्य असते हे खरे. पण मनात उसळलेले भाव सुरचित, सुश्लिष्ट झाले, पूर्वीच्या अनुभूतींशी, मूल्यांशी त्यांचा

संस्कृतिदर्शन