पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/114

हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिवेष्ठनों (आवरणों) से अपने को घेर नहीं रखना चाहिए। अगर जरूरत हों तथा कथित आध्यात्मिक आदि विशेषणों, विशिष्ट आचारों और मनोविकारों को अतिक्रमण करके भी विश्व जनीन सत्य को जानने की कोशिश करनी चाहिए।" (विचार और वितर्क - पृ. १६५).

 आचार्य द्विवेदींचे संस्कृती संबंधाचे आकलन संकीर्णतेकडून उदारमतवादाकडे होणे यातच त्यांचे आधुनिकीकरण सामावलेले आहे. ते निरंतर नावीन्याचा स्वीकार करत स्वतःला आधुनिक बनवत गेलेले दिसतात. यामागे त्यांचं विश्वभान आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.


हिंदू संस्कृतीच्या अभ्यासाचे घटक


 ‘विचार और वितर्क' निबंध संग्रहात संस्कृती या विषयावर लिहिलेला आणखी एक निबंध आढळतो, त्याचे शीर्षक आहे, 'हिंदू संस्कृति के अध्ययन के उपादान'. हिंदू संस्कृतीचा अभ्यास म्हणजे कशाचा तर येथील जात वास्तव, वर्णाश्रम व्यवस्था, वेदाभ्यास, ब्राह्मण ग्रंथ, महाभारत, पुराणादी ग्रंथांचा अभ्यास होय. या पूर्वीच्या निबंधांतून झालेल्या चर्चेशिवाय नव्या कोणत्या गोष्टींची विवेचना आचार्यांनी या निबंधातून केली आहे, ते पाहणे महत्त्वाचे. एक गोष्ट अशी की भारत व या महादेशाची, खंडप्राय देशाची संस्कृती, इतिहास, साहित्य, भाषा, समाज, परंपरा अभ्यासणे म्हणजे हिंदू संस्कृती समजून घेणे होय. या सर्वांचा पट कवेत घेणे देशाचा भौगोलिक विस्तार व प्रदेश वास्तव लक्षात घेता अशक्य नसले, तरी अवघड खचितच.

 हिंदू समाज म्हणून येथील जनसमूहांचा अभ्यास करायचा म्हटले तरी मानववंश शास्त्रज्ञांनी भारतात सात वंशाचे वा प्रकारचे जनसमूह असल्याचे लिहून ठेवले आहे. ते जगातल्या विविध देश, प्रांतांतून इथे आले नि स्थिर झाले. इथल्या माती नि मताशी एकरूप झाले. विशेष म्हणजे ते सर्व काही अपवाद वगळता स्वतःस आज हिंदू म्हणवून घेत आहेत. १) तुर्क व इराणी २) हिंदू आर्य ३) द्रविड ४) आर्य-द्रविड ५) मंगोल-द्रविड ६) मंगोल ७) द्रविड. भारतीय प्राचीन साहित्यात इथे कोणकोणत्या जाती होत्या, त्याचे वर्णन आढळते. त्यानुसार इथे असुर, दैत्य, दानव, नाग, सुपर्ण, यक्ष, किन्नर, गंधर्व, वानर, भालू (अस्वल), शकुनी, उलूक, (प्राचीन भारतातील एक प्रांत ‘उलूक' असल्याचा उल्लेख आढळतो.) मत्स्य, खस (गढवाली) जनसमूह वा जमातींचे उल्लेख आढळतात. या सा-यांची समन्वित संस्कृती हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यांच्या भाषा भिन्न असल्या, तरी त्या

साहित्य आणि संस्कृती/११३