पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/120

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हेच काय, विजापूरच्या मुस्लीम दरबाराचा कारभार मराठी भाषेत व्हायचा. विजापूरचे सुलतान आदिलशहा होते. इब्राहिम आदिलशहा इतका विद्वान नि लोकप्रिय होता की प्रजा त्याला ‘जगदगुरु' म्हणायची. बहामनी साम्राज्यातही प्रशासकीय व्यवहारात हिंदूंना वाव होता. तिकडे विजयनगर साम्राज्यात अनेक सेनाध्यक्ष मुसलमान होते. सैन्यात मुस्लीम शिपाई असणे ही काही नवलाईची गोष्ट नव्हती.

 भारतात मुस्लीम साम्राज्य दृढ होण्यापूर्वीच मुस्लीम फकीर या देशात येऊन स्थिरावले होते. सूफी संत, कवी यासंदर्भात उदाहरण म्हणून सांगता येईल. मुस्लीम देशात त्या वेळी सूफी-संतांना ‘काफिर' मानले जायचे. या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेण्यासारखे आहे. परिणामतः अनेक सूफी फकिरांनी भारतात येणे पसंत केले होते.
 अकराव्या शतकापर्यंत तरी भारतात मुस्लीम राजवट स्थापन झालेली नव्हती. त्या काळात मुस्लीम फकीर नि साधु, संत, सिद्धांना राजकीय वरदहस्त लाभलेला नव्हता. परंतु त्यांचे चारित्र्य-बल उच्च होते. त्याचे विचार नि सिद्धांत उपनिषद आणि वेदात्ताशी मिळते-जुळते होते. अकराव्या शतकात शेख इस्माइल यांनी, तर बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात नूर सतागर इराणींनी अनेक शूद्रवर्णीयांना मुसलमान बनवले होते. मागास जातीतील अनेक मुसलमान झाले खरे पण त्यांच्यावर पूर्वसंस्कार नि परंपरांचा पगडा इतका मोठा होता की, ते तो सोडून मुस्लीम रीतीरिवाज आत्मसात करू शकले नाहीत.

 या जाती गरीब होत्या. त्यातील गरीब मुसलमान गरीब हिंदूंबरोबर आपोआप मिसळत. एक गरीब दुस-या गरिबाच्या भावना लगेच समजून घेतो. अशा जातींपैकी एक ‘योगी' जात होती. मुसलमानांनी ती धर्मांतरित केली होती. ती जात कधीकाळी ब्रह्मचारी असायची. त्या जातीने नंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. हे जोगीच पुढे गोसावी म्हणून ओळखले जाऊ लागले. या जातीनं इस्लाम धर्म स्वीकारला खरा, पण त्यांच्यावरील पूर्वापार हिंदू संस्कार तसेच राहिले. थोडक्यात सांगायचे तर, मुस्लीम नि हिंदू सर्वसाधारण जनतेत दृढ संबंध निर्माण झाले. त्यातही निम्नवर्गीय गरीब जनतेच्या पातळीवर हे संबंध अधिक दृढ व आत्मीय होते, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

 परंतु उच्चवर्णीय अभिजनांत मात्र संघर्षाचे वातावरण होते. विशेषतः राज्यसत्ता गमावलेल्या सवर्णीत हा संघर्ष शिगेला पोहोचला होता. विशेषकरून

साहित्य आणि संस्कृती/११९