पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/126

हे पान प्रमाणित केलेले आहे.

चिश्तीच्या उपासकांत शेकडो हिंदू होते. त्याचप्रमाणे बंगाल प्रांतात मुसलमान लोक हिंदूच्या शीतलादेवी, कालिमाता, धर्मराज, वैद्यनाथ इत्यादी देवदेवतांची पूजा करू लागले. त्यांच्या स्वतःच्या धर्मात मूर्तिपूजेस असलेला विरोध पाहता हे लोकविलक्षण मानावे लागेल. त्याचप्रमाणे मुसलमानांनी आपल्या नवनव्या देवी-देवतांची निर्मिती केली. उदाहरणच द्यायचे झाले तर सांगता येईल की नद्यांचे दैवत ख्वाजा खिज्र, सिंहवाहिनी वनदेवी आणि तिचा प्रेमी आणि अंगरक्षक जिंदा गाजी. ही सारी नवी मुस्लीम दैवते होत. आम्ही एकमेकांच्या वाईट चालीरीतींचेही अनुकरण केले. जसे की हिंदू स्त्रिया पर्दापद्धती पाळू लागल्या. मुसलमानांत जाती प्रथा अस्तित्वात आली. धार्मिक उत्सवात देवघेव सुरू झाली. आपल्याकडील शिवरात्रीप्रमाणे मुसलमानांत ‘शबे बरात सुरू झाली. आपल्याकडील ‘आरती' प्रमाणे त्यांच्यात ‘उतारा' उतरून घेण्याची प्रथा सुरू झाली.

 इस्लाम धर्मात भक्ती भावनेचा उगम झाला. त्या धर्मात मृदुता आली. एक प्रकारची रसार्द्रता निर्माण झाली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात परस्परपूरक घनिष्ठ संबंध निर्माण होऊ लागले. हिंदू-मुसलमानांत आन्तरजातीय, आंतरधर्मीय प्रेम-प्रणयाची उदाहरणे समोर येऊ लागली. हिंदू आपल्या मुसलमान प्रेमिकेस घरी ठेवू लागले. प्रसिद्ध साहित्यशास्त्री पंडितराज जगन्नाथांची प्रेमिका मुसलमान स्त्री असल्याचे ऐकिवात आहे. असेच संबंध हिंदू-मुस्लीम सामंतात दिसून येण्यात आश्चर्य नाही. पण एक गोष्ट निश्चित की सामान्य जनतेत असे सबंध फार पूर्वीपासून दिसून येतात. अकबरांनी राजपुतांत असे संबंध निर्माण केले. खरे तर ते भारतीय जनमानसात पूर्वापार आढळतात. राजकीय क्षेत्रात हिंदू-मुसलमानांचे मांडलिक झाले, त्याचप्रमाणे हिंद राजांच्या घरी मुस्लीम नबाब, जहागीरदार, सरदार असत.

 भारतीय जनता आपल्या परीने या सर्व परिस्थितीचे आकलन, विश्लेषण करत होती. हिंदूचे मुसलमानांशी तसेच मुसलमानांचे हिंदूंशी प्रेमाचे संबंध निर्माण होत होते. परंतु त्या काळात औरंगजेबासारख्या धर्मांध शासकांची शक्ती नि वृत्ती काही क्षीण नव्हती. मुगल दरबारात एकीकडे शहाजहान उदार तर दुसरीकडे त्याचा मुलगा दारा अनुदार तसाच संकुचित वृत्तीचा त्याचा भाऊ औरंगजेब! अशाच परस्पर विरुद्ध संघर्षशील वृत्ती हिंदूतही दिसून यायच्या.

 या प्रवृत्ती आजही आहेत. त्यामुळेच भारतात सामाजिक सांस्कृतीचा विकास होऊ शकत नाही.

साहित्य आणि संस्कृती/१२५