पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/159

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मांडणारा भाष्य ग्रंथ होय. 'अव्यवस्था और अपराध'मध्ये जैनेंद्रकुमारांनी विविध प्रश्नांवर या प्रकरणी आपली मते स्पष्ट केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात आपले, जे सांस्कृतिक जीवन घडले प्रमेय मांडत जैनेंद्र येथे शिक्षण व संस्कृतीसंबंधाची खुलेपणे चर्चा करताना दिसतात. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात आंतरिक सुरक्षा, प्रशासन व शांतता हे कळीचे मुद्दे बनले. प्रशासन हे स्वातंत्र्यानंतर हिंसेचे हत्यार बनणे हे जैनेंद्रांसारख्या गांधीवादी व जैनधर्मीय संस्कारात वाढलेल्या चिंतकास मान्य होणे कदापि शक्य नाही. परंतु स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय इतिहास या संदर्भात काळाच राहिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एक स्वतंत्रता सेनानी म्हणून कार्य करणा-या जैनेंद्रांना त्याबद्दल खंत वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. याचे खापर जैनेंद्रांनी इथल्या शिक्षण व्यवस्थेवर फोडले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेली विद्यार्थी आंदोलने गुजरात, आसाम, ईशान्य प्रांत व अगदी अलीकडची हैद्राबाद, (वेमुला) व नवी दिल्ली (कन्हैयालाल) इथपर्यंत त्यात सातत्यच दिसून येते व जैनेंद्रांची चिंता सिद्ध होते. येथील शिक्षणाचा ढिला ढाचा' (भुसभुशीत पाया/रचना) जैनेद्रांना अस्वस्थ करतो. शिक्षण क्षेत्रातील पैशाचे साम्राज्य वाचत असताना उगीचच आजचे, आत्ताचे शिक्षण धोरण, साम्राज्य सामान्य वाचकांत आठवत रहाते. शिक्षणाचे प्रश्न ‘मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत त्यांना पसंत नाही. धर्म शिक्षण पण ते उपाय मानत नाहीत. युरोपमध्ये शिक्षणाचा व अर्थकारणाचा यशस्वी मेळ घातल्याने तिथे तुलनेने कमी विषमता, दारिद्र्य, बेरोजगारी आहे, हे स्पष्ट करत जैनेंद्रांनी वर्ग व झुंडीच्या (Class/Mass) समाज व मानसशास्त्रावर प्रकाशझोत टाकला आहे. इथल्या गुन्हेगारांना सामाजिक मान्यता व प्रतिष्ठा मिळते हे जैनेंद्रांच्या लेखी न सुटणारे कोडे बनून जाते. इथल्या बेकारीच्या व गुन्हेगारीचा अन्योन्याश्रित संबंध जैनेंद्र व्यक्त करतात. ते बेकारी दूर करण्याचा उपाय नोक-यांची निर्मिती मानत नाहीत. उत्पादकता विकासाचे धोरण त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यांनी म्हटले आहे की, “काम (श्रम) का संबंध अगर सीधा हमारी आवश्यकताओं से जुड़ता है, तो उसमें रस पड़ता है और वह सृजनात्मक हो जाता है। बेरोजगारी को दूर करते के सिलसिले में पहली जरूरत तो यह मालूम होती है की काम का संबंध पैसे से हटकर जीवन से जुड़े।" (पृ. ३३२). या संदर्भात जैनेंद्रांनी शासकीय धोरणाच्या मर्यादा नोंदवत प्रयोगशीलता कशी महत्त्वाची ते स्पष्ट केले आहे.

साहित्य आणि संस्कृती/१५८