पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/170

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आस्थेचे महत्त्व असते. प्रभाकरांनी टॉलस्टॉयची एक गोष्ट सांगून ते स्पष्ट केले आहे. आजच्या शिक्षणातून आस्था वजा होण्याने संस्कृती विकासात शिक्षणाची भूमिका नगण्य होत जाणे विष्णू प्रभाकरांना चिंतेची बाब वाटणे स्वाभाविकच म्हणावी लागेल.

 संस्कृतीपूरक वरील घटकांची चर्चा ही नित्याची गोष्ट होय. पण विष्णु प्रभाकरांनी यासंदर्भात ‘सौंदर्य धारणा' घटकाचा केलेला विचार सर्वथा नवा म्हणावा लागेल. संगीत, नाटक, नृत्य, कला, साहित्य या सर्वांतून सौंदर्य तत्त्व समाजात प्रस्थापित होत असते. राजसत्तेसही कला, सौंदर्याचा मोह असतो. सौंदर्य तत्त्व केवळ संस्कार नि मनोरंजनाचे साधन नाही, तर मानवी जीवनाच्या निखळ आनंदाशी त्याचा संबंध आहे. अभिव्यक्तीतून सौंदर्य साकारत असते. काळ कोणताही असो वा राजसत्तेचे स्वरूप वा विचारधारा कोणतीही असो, सर्वांत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व राहिले आहे. जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतो तिथे सत्तेशी संघर्ष अटळ असतो. कारण मनुष्य आनंद गमावू इच्छित नसतो. सौंदर्याचा एक अविभाज्य घटक असतो नैतिकता. कला नैतिक हवी. चित्रकला, शिल्पकलांमध्ये नग्नांगिनींचे अथवा नग्नांचे प्रदर्शन पूर्वापार आहे. पण प्राचीन काळ आणि आधुनिक काळ अशी तुलना जेव्हा नग्न सौंदर्याच्या संदर्भात होते, तेव्हा अठराव्या शतकाकडून आपण जसजसे 'आज'कडे येऊ लागतो तसे सौंदर्याचे साजरीकरण प्रकर्षाने पुढे येते. त्रुल्ज, लात्रे, पाब्लो, पिकासो सर्वांनी केलेले सौंदर्य चित्रण आणि रेनूआचे चित्रण यात फरक आढळतो तो दृष्टिकोनामुळेच. संस्कृतीचा बाज तिच्या विविधांगी नैतिक व सौंदर्यवादी दृष्टीतून साकार होत असतो हेच खरे. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात बाजारवादाचे सर्वाधिक आक्रमण कुठे झाले असेल तर कला, संस्कृती व सौंदर्य क्षेत्रात. तेच संस्कृतीपुढचे आजचे आव्हान आहे.

 ‘जन, समाज और संस्कृति' ग्रंथातील विष्णू प्रभाकरांचे ‘जन, समाज और संस्कृति : एक समग्र दृष्टि’ आणि ‘संस्कृति और धर्म' हे दोन लेख ही त्यांनी आकाशवाणी, नवी दिल्लीवरून ‘डॉ. राजेंद्रप्रसाद व्याख्यानमालेत १५ आणि १६ डिसेंबर, १९८० रोजी दिलेली भाषणे आहेत. पस्तीस एक वर्षे उलटून गेली तरी ती आज वाचकांना प्रेरक व मनोज्ञ वाटतात, त्याचे रहस्य लेखकाच्या सर्वग्राही व समग्र वृत्तीमुळे. लेखक संस्कृतीचा संबंध ‘विश्व मानव' संकल्पनेशी जोडत आपल्या लेखनास वैश्विक बनवतो. भारतीय संस्कृतीची अवधारणा जिच्या बहुत्व आणि वैविध्यात सामावलेली

साहित्य आणि संस्कृती/१६९