पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/179

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयत्न होता की, श्राद्ध विवाहाची सर्वमान्य रीत ठरवता येते का, उत्सव, सण, समारंभ एकाच पद्धतीने सर्वत्र कसे साजरे करता येऊ शकतील. भारतीय विचारधारांच्या समन्वयाचा हा आजवरचा सर्वांत मोठा नि व्यापक प्रयत्न होता. हेमाद्री, कमलाकर ते रघुनंदनपर्यंतच्या अनेक मनीषींनी मोठ्या मेहनतीने जिवाचे रान करून पाहिले, परंतु सर्वसंमत असा निर्णय होऊ शकला नाही. परंतु एक गोष्ट निश्चित की यातून स्तूपीभूत शास्त्रार्थातून समान धर्माचार, धर्ममत स्थिर करणे शक्य झाले. निबंध ग्रंथांचे हे महत्त्वपूर्ण योगदान मानावे लागेल. आज ज्याला ‘हिंदू एकता' (Hindu Solidarity) मानले जाते त्याची आधारशीला यातून आकाराला आली. पण यातूनही आपल्या धर्म व समाजासंबंधी समस्यांचे निराकरण होऊ शकले नाही.

 या प्रयत्नातील अपयशाचं कारण आचाराचा कर्मठपणाच म्हणावा लागेल किंवा आचार प्राधान्य मानावं लागेल. ज्या इस्लाम धर्माचं भारतात आगमन झालं होतं, तो या कर्मकांडास अजिबात महत्त्व देत नव्हता. त्या धर्माचे संगठनच मुळी या सर्व विरोधातून झाले होते. निबंध ग्रंथांतून जो एक धर्म' प्रसृत झाला होता, त्यात सर्वांना सामावून घेण्याचे धोरण होते. सर्व शास्त्र मतांचा आदर करून ही असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु भारतीय समाजाचा ज्या मुस्लीम धर्माशी मुकाबला होता, तो प्रतिस्पर्धी धर्म हिंसक होता शिवाय तो अन्य धर्ममतांचा व्हास करण्याबाबत दृढ प्रतिज्ञ नि कृतसंकल्प होता. धार्मिक हिंसा हेच त्याचं अमोघ अस्त्र होतं. परंतु तो धर्माच्या अंगाने जरी हिंसक असला, तरी सामाजिक दृष्ट्या मात्र समावेशक, ग्रहणशील होता. याविरुद्ध हिंदू समाज होता. हिंदू समाज धार्मिक आचरणास मान्यता देणारा असला, तरी व्यक्तिपरत्वे भेद करणारा मात्र निश्चित होता. तिकडे मुसलमान धर्म अन्य धर्मीयांना आपल्या धर्मात घेण्यास उत्सुक होता. इतकेच नव्हे, तर तो त्यास प्राधान्यही द्यायचा परम कर्तव्य मानायचा. दुसरा धर्मावलंबी त्याच्या लेखी नगण्य होता. निबंध ग्रंथांनी हिंदूना अधिक कर्मठ केले. त्यांनी मुस्लिमांना आपल्या धर्मात समाविष्ट करून घ्यायचा मार्ग मात्र नाही दाखवला.

 अशा प्रकारे मुसलमान धर्माच्या आगमनाची प्रतिक्रिया म्हणून हिंदू धर्म कर्मकांडी बनला. तीर्थ, व्रत, उपवास, होम इ. रीतिरिवाज केंद्री धर्म असे त्याचे स्वरूप बनले. या वेळी पूर्व आणि उत्तरेत नाथपंथी योगींचा मोठा प्रभाव होता. नाथपंथी लोक शास्त्रीय स्मार्त मतास जुमानत नसत. ते ‘उपनिषद', ‘ब्रह्मसूत्र', 'गीता' इ. वर्णित तत्त्वज्ञान मानीत नसत. असे असले,

साहित्य आणि संस्कृती/१७८