पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/180

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तरी जनतेत आपले बस्तान बसविण्यात ते यशस्वी झाले होते. आपल्या सिद्धी, चमत्कारांद्वारे त्यांनी समाजमानसात मानाचे स्थान पटकाविले होते. नाथपंथी निर्गुणोपासक, शिवपूजक होते. ते ध्यानधारणा, समाधी योग इ. द्वारे उपासना करत होते. विभिन्न शारीरिक क्रिया-कलाप इ. द्वारे ईश्वरप्राप्तीचा ते दावा करीत होते. नाथपंथी योगी ब्रह्मचारी होते, परंतु त्यांचे शिष्य मात्र गृहस्थ, संसारी असायचे. ते आश्रम बहिष्कृत असले, तरी योगी म्हणून समाजात सन्मानित असायचे. हिंदू धर्म मात्र अशांना तिरस्कृत, बहिष्कृत मानायचा. या आश्रमभ्रष्ट योग्यांना हिंदू धर्म बहिष्कृत समजले जायचे. कारण त्यांचे धर्माचार हिंदू धर्मानुकूल नसायचे. ते मुसलमान धर्मानुकूलही नसायचे. ते मुसलमान धर्म मानत नव्हते. पण काही काळ गेल्यानंतर मात्र हळूहळू इस्लाम धर्म तत्त्वांशी सलगी करू लागले. अशा संक्रमणकाळात कबीरदासांचा संतकवी म्हणून उदय झाला.

 इथे आणखी दोन धार्मिक आंदोलकांची चर्चा करणे आवश्यक आहे. पैकी एक आंदोलनाचे आगमन पश्चिमेकडून झाले. हे सूफीमत म्हणून वा संप्रदाय म्हणून ओळखले जाते. धर्मांध मुसलमान हिंदू धर्माच्या मर्मावर आघात करण्यात अपयशी ठरले होते. त्याचा परिणाम हिंदूंवर झालेला असला तरी तो बाह्य स्वरूपाचा होता. सूफी संप्रदायी हे भारतीय धर्मसाधनेशी सामंजस्य साधणारे होते. त्यांच्या उदार प्रेममार्गी भक्तीने हिंदूची मने जिंकायला नुकतीच सुरुवात केली होती. असे असले, तरी कर्मकांडप्रिय हिंदू धर्माशी सलोखा नाही करू शकले. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बौद्ध धर्माधारित वैराग्य न सूफीवाद, न नाथ संप्रदाय पेलू शकला. भारतात प्रथमच वर्णाश्रम व्यवस्थेस अभूतपूर्व हादरा बसला होता. आजवर वर्णाश्रम व्यवस्थेस कुणी आव्हान दिलेले नव्हते. आचारभ्रष्ट व्यक्तीस समाज बहिष्कृत केले जायचे. ते नव्या जातीची स्थापना करायचे. त्यामुळे जाती, उपजातींचे अमाप पीक फोफावत राहिले. तरी वर्णाश्रम व्यवस्था तग धरून होती. अशा पार्श्वभूमीवर समोर एक असा प्रतिस्पर्धी उभा ठाकला होता जो प्रत्येक बहिष्कृतास स्वीकार करण्याची तत्परता दाखवायचा, उत्सुकही असायचा. त्याची फक्त एक अट असायची ती धर्मातराची. पूर्वी अशी व्यक्ती असहाय्य असायची. आता त्यांच्यापुढे मुसलमान धर्माचा पर्याय उपलब्ध होता. इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश की तो एका मोठ्या समाज वर्गाचा भाग बनायचा. अशा परिस्थितीत दक्षिणेत भक्ती आंदोलन उदयाला आले. ते वेदान्तावर उभे होते. पाहता पाहता ते आसेतु हिमालय पसरले. डॉ. ग्रियर्सन

साहित्य आणि संस्कृती/१७९