पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/29

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनोवृत्ती तसेच वैचारिक अतिवाद वा अतिरेकाविरुद्धच्या प्रतिक्रियेने झाला. अमेरिकेतील विल्यम जेम्स, इंग्लंडमधील एफ. एस. सी. एस. शिलर, फ्रान्समधील हेन्री बर्गसन यांच्यासारखे विचारक या प्रतिक्रियावादी गटाचे नेते होते. या गटातील जेम्स, शिलर, अँडले प्रभृती विद्वान हे ब्रिटिश ब्रह्मवाद्यांचे उघड शत्रू होते. बर्गसनचा उत्क्रांतीवादी हा मुख्यतः वैज्ञानिक यंत्रवादाचा प्रतिवाद करणारा होता, तसाच तो अध्यात्मवादी उपयोगवाद विरोधीही होता. जेम्स आणि शिलर बुद्धीऐवजी कृती (Will) चे समर्थक होते. त्यांनी आत्मसंगती (Coherence) पेक्षा व्यावहारिक यशस्वीतेस महत्त्वाचे स्थान दिले. त्यानंतर काही दिवसांतच युरोप आणि अमेरिकेत नव आणि समीक्षात्मक वास्तवतावाद (New and critical Realism) उदयाला आला. या नववादाने अध्यात्मवादी ज्ञानमीमांसेस आवाहन दिले. परंतु या वास्तववादी तत्त्व चिंतकात जेम्स आणि बर्गसनच्या बुद्धिविरोधी पक्षपाताचा अभाव होता.

 पहिल्या महायुद्धानंतर मात्र युरोप आणि अमेरिकेतील बुद्धिवादी समुदायावर इतर विचारांचा प्रभाव वाढू लागला. या प्रभावात नवीन भौतिक विज्ञानाचे (Physics) वर्चस्व होते. तत्पूर्वी मॅक्स प्लँकनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी क्वांटम सिद्धांताचे प्रतिपादन केले होते. पुढे सन १९०५ मध्ये आइन्स्टाइनने सीमित सापेक्षवादाची (Restricted principle of Relativity) मांडणी केली. असे असले तरी अन्य ज्ञान-विज्ञानक्षेत्रातील तत्त्व चिंतकांना सापेक्षवाद समजण्यास बराच काळ जावा लागला. आइन्स्टाइनने नंतर सन १९१५ मध्ये सामान्य सापेक्षवाद (General Principle of Relativity) स्पष्ट केला. मग पुढे हाइजेन बर्गने आपल्या अनिर्धारण सिद्धांताचे (Principle of Indetrerminacy) प्रतिपादन सन १९२७ मध्ये केले. पदार्थ विज्ञानातील या नव्या विचार वा शोधांमुळे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात तर्कमूलक भाववादाचा (Logical Positivism) जन्म झाला. या भाववादाचा प्रभाव नंतरच्या दशकावर स्पष्टपणे दिसून येतो.

 आपण असे म्हणू शकतो की ज्या विचारधारेस तत्त्वज्ञानासंबंधी (Metaphisical) विशेष वैरभाव आहे वा विरोध आहे तो तर्कमूलक भाववाद तथाकथित अनुभववादाचे अतिरंजित वा अतिशयोक्त रुपच होय. जरी तर्कमूलक भाववादी बुद्धीविरोधी नसले तरी त्यांच्या मनात विशुद्ध बाद्धिक चिंतन (Speculative Reasoning) विषयी अविश्वासाची भावना आहे. ते अशा कोणत्याही उपपत्ती (Hypothesis) वा सिद्धांतावर (Theory)

साहित्य आणि संस्कृती/२८