पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/54

हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणणे न्यायोचित होणार नाही. त्याचे कारण असे की नागार्जुन, धर्मकीर्ती, श्रीहर्ष, कुमारिल, शंकर यांचे लेखन वाचले की भारतीय तत्त्वचिंतकांत निगमात्मक युक्तिवाद (Dialectical) करण्याची क्षमता होती, हे तर स्पष्ट होतेच शिवाय अशा प्रकारच्या विचारांवर त्यांचे प्रेम होते हेही दिसून येते. मग प्रश्न असा पुढे येतो की इथे भौतिकवादी विज्ञानांचा विकास का झाला नाही? पण हा प्रश्न इजिप्त, रोमन चिंतकांच्या संदर्भातही विचारला जाऊ शकतो.

 नाप यांनी पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारधारा व विचारक यांच्या संबंधाने वर जे मत व्यक्त केले आहे, त्याचा प्रतिवाद वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. पौर्वात्य संस्कृती आणि विचारधारा ही सामान्यतः आणि विशेषत्वानेही मानवाचे दु:खहरण कसे होईल, ते बदलणे कसे शक्य आहे, बाह्य परिस्थिती कशी नियंत्रित व परिवर्तित होऊ शकते, याबद्दल सदैव चिंतित दिसून येते. आशियातील चीन, भारत देशातील बौद्ध धर्म, ताओ संप्रदाय यांच्या चिंतेचा प्रधान विषय मानवी दु:खच राहिला आहे. आपण न्याय आणि सांख्य दर्शन वाचू लागू तर त्यांचा प्रारंभच मुळी मोक्ष अथवा निवृत्ती ही प्रधान पुरुषार्थ असल्याचे विवेचनातून स्पष्ट होते. आशियाचे धर्मदीप हेच सांगत आलेत की, माणसाच्या सुख, दु:खाचे मूळ त्याच्या व्यक्तित्वात, आत्मिक वृत्तीत आहे. भारताची आर्ष दर्शनेही (ऋषी चिंतन) व्यक्तिगत चेतना, प्रेरणांचे विश्लेषण, मूल्यांकन करत एक प्रकारे व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्य व सुखाचाच विचार करतात असे दिसून येते. नाथूप ज्या साक्षात्कार मूलक अनुभव संचिताची चर्चा करतात, तेच पौर्वात्य चिंतक साक्षात अनुभूती म्हणून तिचे प्रतिपादन करताना दिसतात. ती अनुभूती कल्पनामूलक प्रतिभा आणि आंतरिक दृष्टिबोधाने प्राप्त होऊ शकते. यातून हे लक्षात येते की भारतीय चिंतक साक्षात्कार आणि अनुभूतीवर का जोर देतात. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बाह्यगोचर अनुभूती (Sensible Continuum) अथवा अनुभव संचयाचा शोध याबाबत भारतीय चिंतकांनी फारसा रस घेतलेला आढळत नाही. सामान्यतः आशियाई चिंतक आणि विशेषकरून भारतीय चिंतक मानवाच्या व्यक्तिगत प्रेरणा, सांस्कृतिक आणि आध्यामिक विकासाकडे अधिक लक्ष देतात त्यांना भौतिक जीवन व परिस्थितीत फारसे स्वारस्य दिसून येत नाही. ते समाज जीवनाबद्दल जरूर विचार करतात, पण प्राधान्य व्यक्ति विकासासच राहते. पौर्वात्य चिंतनात सभ्यतेवर (Virtue) अथवा धर्ममूलक जीवन

साहित्य आणि संस्कृती/५३