पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/89

हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती. इथे बौद्ध विहार होते. हजारो भिक्षुक तिथे धर्म शिक्षा, दीक्षा घेत. संस्कृत शिक्षण भाषा होती. ब्राह्मी, खरोष्ठी लिपी प्रचलित होत्या. दक्षिण पूर्व आशियात भारतीय व्यापारी व धर्मप्रचारक पोहोचले होते. ब्रह्मदेश, मलाया, सुमात्रा, जावापर्यंत भारतीय धर्म, भाषा, विद्या, संस्कृती पोहोचलीच नव्हती तर रूजलीही होती. कंबोडिया, चंपा, श्रीक्षेत्र, यवद्वीपपर्यंत भारत विद्या (Indology) प्रचारित प्रसारित होती. (ही परंपरा आजही अखंड रूपात सर्व जगात आढळते.) बोर्जिओ, बाली येथेही हा प्रचार पोहोचला होता.


१६. मध्ययुगाचा प्रारंभ


 सन ७00 ते १२०० असा सुमारे पाचशे वर्षांचा काळ मध्ययुग म्हणून इतिहासात ओळखला जातो. राजकीय दृष्टीने पाहाता लक्षात येते की हा छोट्या छोट्या राज्यांचा काळ होता. सरदार संस्थानिक बनून राजे म्हणून मिरवत होते. प्रत्येक संस्थानात स्वतंत्र घराणी राज्यकर्ती बनली होती. कनोजला प्रतिहार व राठोड, दिल्लीत चौहान आणि तोमर, बुंदेलखंडात चंदेल, माळव्यात परमारांचे राज्य होते. राज्यासच राष्ट्राचे रूप आलेले. अशात राजपुतांचा उदय झाला. त्यांनी अनेक संस्थाने जिंकून आपले राज्य विस्तारले. रजपुतांची स्वत:ची संस्कृती होती. जोहार, सती, केसरिया प्रथांद्वारे राजपूत एक होते. एकीचा काही एक लाभ त्यांना निश्चित झाला. दुसरीकडे दक्षिण भारतात हिंदू, शैव, लिंगायत धर्मांनी आपले पाय पसरत धर्मप्रचार, प्रसारात कसूर ठेवली नाही.


१७. भारतात मुसलमानांचे आगमन


 गजानन माधव मुक्तिबोधांनी ‘भारत : इतिहास और संस्कृति' ग्रंथात भारतीय जनमानसावर मोहिनी असलेल्या सर्व धर्मप्रमुखांवर लिहिले आहे. तसेच ते या प्रकरणी हजरत मोहमदवर लिहायलाही विसरली नाहीत. मुस्लीम धर्मात ‘इस्लाम' शब्दाचा अर्थच आहे मुळी 'शांती'. पण धर्मप्रसारक शासकांनी मात्र प्रसारार्थ हिंसेचा वापर केला. भारतात अरब दक्षिणेत समुद्रमार्गे आले. ते चांगले दर्यावर्दी होते. मोहमद बिन कासिम यांचे उदाहरण. तिकडे तुर्क शासक, मोहमद गझनीने पंजाबवर स्वारी केली. सन ११७३ मध्ये मोहमद घोरीने रजपुतांचा पराभव करत पृथ्वीराज चौहानाला नमवले. दिल्लीचे

साहित्य आणि संस्कृती/८८