पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/95

हे पान प्रमाणित केलेले आहे.

इंग्रजी बनून गेला. भारतभर असंतोष पसरला. सन १७00 ची औद्योगिक क्रांती. सन १७५७ चे प्लासीचे युद्ध, सन १७७0 चा बंगालचा दुष्काळ या सर्वांची परिणती शेतकरी व कामगार, कारागिरांचे हातावरचे पोट भुकेच्या भक्ष्यस्थानी पडले. दिल्ली, मेरठ, कानपूर, नागपूर, अवध, काशी सर्वदूर पसरलेल्या असंतोषाचे रूपांतर हिंदू-मुसलमान एकीत झाले. सर्वत्र स्थानिक संस्थानिकांनी इंग्रजी फौजाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यातच इंग्रजी सेनेतील हिंदी फौजांनी बंड पुकारले. तात्या टोपेंना दिलेली फाशी, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना आलेले वीर-मरण यातून असंतोष संघटित होऊन विद्रोह, बंडाचे रूप घेत १८५७ मध्ये पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात त्याचे रूपांतर होणे स्वाभाविक होते. अजिमुल्ला खान, मंगल पांडे यांचे वीरमरण व साहस यांनी पण या युद्धात महत्त्वाची भूमिका वठवल्याचे दिसून येते.


२५. भारताचा पराभव का झाला?


 एवढे होऊनही ब्रिटिश पुढे सन १९४७ पर्यंत सुमारे ९० वर्षे कार्य/साम्राज्य करत राहिले कसे ? याची मीमांसा करताना मुक्तिबोधांनी स्पष्ट केले आहे की विदेशी शासक संघटित होते. त्यांच्या सेनेत शिस्त होती. सेनेचे विविध विभाग होते. ते कार्यक्षम व कार्यरत होते. भारताच्या इतिहास, भूगोलाबरोबर ब्रिटिश वर्तमानाचे वस्तुनिष्ठ आकलन करत नीती ठरवत ब्रिटिशांची गुप्तचर यंत्रणा भारतभर सक्रिय होती. उलटपक्षी ब्रिटिश स्थानिक राज्यकर्ते, संस्थानिक यांना हे पटवून देण्यात यशस्वी ठरले होते की त्यांना व्यापारात रस आहे. साम्राज्य विस्तारात नाही. स्थानिक राज्यांमध्ये संघटन तर सोडाच पण परस्पर स्पर्धेचीच भावना होती. ते आपल्या संस्थानापुरते पाहण्यात मशगूल होते. राष्ट्रीयतेचा अभाव सार्वत्रिक होता. संकुचितता, वैमनस्य, अज्ञान, दारिद्र्य, राजभक्ती (स्व राजांविषयी) ही पहिल्या स्वातंत्र्य लढ्याच्या पराभवाची प्रमुख कारणे देत या ग्रंथात मुक्तिबोधांनी सविस्तर विवेचन केले आहे. ते आत्मटीकेचे उदाहरण म्हणून वाचनीय, विचारणीय झाले आहे.


२६. भारतात आधुनिक युगाचा उदय


 सन १८५७ च्या बंडापूर्वीच खरं तर बंगालमध्ये इंग्रजांच्याच संपर्काने शिक्षण, उद्योग विस्तार, प्रचार, प्रसारातून नवशिक्षित मध्यम वर्ग निर्माण

साहित्य आणि संस्कृती/९४