या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० सुखाचा शोध. मोठा विलक्षण परिणाम झाला होता. वडिलांना हो ह्मणून कळवावें, तर एका शेंबड्या वड्या गृहिणीबरोबर जन्म कंठावा लागणार आणि त्यांना नाहीं ह्मणून कळवावें, तर त्यांची विलक्षण अवज्ञा केल्यासारखे होणार! अशा अडचणींत या वेळी दिनकर सांपडला होता. शिवाय वडिलांचा स्वभाव त्याला माहीत नव्हता असे कांहीं नाहीं. त्याच्या बापाचा स्वभाव त्याच्या हिपेक्षां बाणेदार वृत्तीचा असल्यामुळे आपले नकारार्थी उत्तर वडिलांच्या मानी स्वभावाला अर्थातच पसंत पडणार नाहीं आणि त्याचा परिणाम कांहीं भलताच झाल्यावांचून राहणार नाहीं, हीहि भीति दिनकरला चाटत होती. वडिलांची समजूत घालण्यासाठी हाणून त्याने विद्वत्ताप्रचूर शब्दांनीं एकदोन तरजुमे तयार केले; पण ते पाठविण्याचें त्यास धैर्य झाले नाहीं. शेवटीं गांवीं गेल्यावर आईच्या मध्यस्थीनें हें लग्न मोडावयाचें असे त्याने ठरविले आणि झोंप घेण्यासाठीं तो अंथरुणावर पडला. पण तें मनोव्यथेचें भूत त्याच्या छातीवर रात्रभर नाचत राहिल्यामुळे त्याला चांग- 'लीशीं झोंप लागली नाहीं. ती रात्र त्याने स्वप्नसृष्टीतच घालविली. अशा विलक्षण चिंतातुरावस्थेंत दिनकरचा एकेक दिवस जाऊं लागला. त्याला ही एक मोठी आपत्तीच वाटली; पण ती कशी टाळावी हे मात्र त्याला समजेना. विशेष परिचित अशा स्नेह्यांजवळ तो जेव्हां बोलूं लागे, तेव्हां त्या मुलीबरोबर लग्न न करण्याचा त्यानें जणूं कृतनिश्चय केला आहे, असें दृष्टोत्पतीस येई. अशा स्थितींत दिनकरचे कांहीं दिवस गेले आणि उन्हाळ्याच्या सुटीमुळे कॉलेज बंद झाल्यावर तो आपल्या घरी निघून गेला. वडील बंधु व मातोश्री या दोघांच्या मध्यस्थीनें हें लग्न आपण मोडूं असा त्याला मोठा विश्वास होता. आपला युक्तिवाद आपल्या आईबापास पसंत पडेल, अशी त्याला फार आशा होती; पण तो घरी जाऊन आठदहा दिवस झाले नाहीत, तोंच त्याने स्वतःच आपल्या मित्र मंडळीस लग्नाची पत्रिका पाठविली. रामभाऊ, विश्वनाथ व पांडुरंग या तिघांच्या हाती जेव्हां आमंत्रणपत्रिका पडल्या, तेव्हां त्यांना पराकाष्ठेचें आश्चर्य वाटले व ते तिघेहि मोठ्या आनंदानें दिनकरच्या गांवीं त्याच्या लग्नासाठीं हजर झाले.