पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकत घेणे हे सर्व बुद्धिगम्य मार्ग गुन्हेगारांना खुलेच राहतात!
 ३.०५ मला फायदा होत नसेल तर मी काम का करावे? मी कायदे का पाळावेत? मी चांगले का वागावे? मी शोषण का करू नये? मी मानवी व्यवहारात समता का मानावी? माझ्या हातात जे गावले आहे ते मी का सोडावे? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक समाजात व प्रत्येक काळात नव्याने शोधावी लागतात. ती पक्की ठरवल्याविाय व्यवस्थापनासारख्या लोकव्यवहाराच्या कामात पाऊल पुढे टाकता येत नाही. त्याची स्पष्ट जाण असो वा नसो पण ती आपण गृहीत धरत असतो. व्यवस्थापक म्हणून मी हिंदुस्थानात काम करतो त्यावेळी माझ्याबरोबर काम करणारे लोक कोणती मूल्ये मानतात, त्यांची गृहीत कृत्ये काय आहेत याची कल्पना मला असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे परकीय चष्म्यातून पाहिले तर माझी उत्तरे चुकणार हे उघड आहे. कारण प्रश्नाची समज किंवा 'दर्शन' हेच प्रश्नाचे उत्तर' शोधण्याचे महत्त्वाचे साधन असते. Perception of a problem is a solution of the problem.
 ३.०६ भारतीय दर्शनात व्यक्तीचा देह ही क्षणभंगुर व तात्पुरती गोष्ट मानलेली आहे. पुनर्जन्माच्या कल्पनेप्रमाणे व्यक्तीचा आत्मा हा चिरंतन आहे. देह हा महत्त्वाचा मानलेला नाही. आत्मा अविनाशी आहे, त्याला आदि नाही आणि अंतही नाही. देह हा वस्त्रासारखा आहे. जुने जाऊन नवीन येत राहणार. तेव्हा माझा देह म्हणजे मी नव्हे. 'कोऽहम्'चे उत्तर माझा देह हे नव्हे. यालाच अध्यात्मात 'देहभाव' अशी संज्ञा वापरतात. मी कोण?चे उत्तर, अद्वैत वेदांत मताप्रमाणे 'अहं ब्रह्मास्मि' म्हणजे 'मी ब्रह्म आहे' असे आहे. 'स्व' च्या खऱ्या, व्यापक रूपाची ओळख झाली की बऱ्याच गोष्टींकडे निराळ्या दृष्टीने पाहता येते. मुळातच सर्व संदर्भात आमूलाग्र बदल घडून येतो. यालाच 'पस्पेक्टिव शिफ्ट' किंवा संदर्भबदल असे म्हणतात आणि तो महत्त्वाचा असतो.

 ३.०७ तुम्ही जेव्हा कॅमेऱ्यातून निसर्गदृश्याकडे पाहता त्यावेळी सबंध दृश्यातला एक तुकडा तुम्ही तुमच्या काचेसमोर आणता. समोरच्या सर्व दृश्याला तुम्ही तुमच्या मनातल्या चौकटीत बंदिस्त करत असता. तेवढेच प्रकाशचित्र कॅमेऱ्यातल्या पट्टीवर नोंदवून घेता. ते तुमचे 'दर्शन' असते. ते सत्य असते का? याचे उत्तर होय किंवा नाही असे दोन्ही तन्हांनी संभवते. कुठल्याही प्रकाशचित्रकाराला तुम्ही विचारलेत तर तो सहज सांगेल, की नुसती चौकट बदलून त्या मूळ चित्रातून वेगळा अर्थ व्यक्त करता येतो. संपूर्ण भिन्न असे दोन अर्थ दाखवता येतात. पुष्कळशी चमत्कारिक कोडी, विनोद हे सारे चौकटीच्या बदलातून निर्माण होताना दिसतात. चौकटीतला बदल हा चित्राच्या अर्थाचा

१४ सुरवंटाचे फुलपाखरू