पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय बारावा


सत्याचे अनुभव



 १२.०१ व्यक्तीच्या जीवनात 'श्वासा'चे जे महत्त्व आहे ते सामाजिक जीवनात 'विश्वासा'ला आहे. विश्वासाशिवाय सामाजिक व्यवहार अशक्य आहे.व्यापार-व्यवहारात व उद्योगात याला खूप महत्त्व दिले जाते.व्यक्ती बोलते,शब्द देते, आश्वासन देते. त्यावर लोकांचा विश्वास बसतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.थापा मारणे, वेळ मारून नेणे,शब्दांत न सापडणे,मोघम बोलणे, यातच धंद्याची गुरुकिल्ली आहे असे मानणारे बरेच लोक आढळतात.खोटे बोलणे व्यवहारात आवश्यक असते असे मानणारे लोकही असतात.विक्रयकला, व्यवस्थापन, राजकारण यांत खोटे बोलणे हे क्षम्य असते असे मानण्याचीसुद्धा पद्धत आहे.

 १२.०२ पण हे खरे आहे का? दूरदृष्टीच्या आणि दीर्घकाल यशस्वी ठरलेल्या धंदेवाईक माणसाला हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तो हे खोटे आहे असेच सांगेल.एखाद्या माणसाला,एखाद्या वेळी,भूलथापा मारून,खोटे बोलून एखादा सौदा किंवा व्यवहार फायद्याचा,अगदी घसघशीत फायद्याचा करणे जमेल.पण अशा एखाददुसऱ्या सौद्यावर किंवा व्यवहारावर धंद्याचे दीर्घकालीन धोरण ठरवता येत नाही किंवा गणित बांधता येत नाही.धंदा करणे,दुकान चालवणे,कारखाना चालवणे ही रोजच्या रोज सातत्याने दीर्घकाळ करायची गोष्ट असते.धंदा ही अनेक व्यवहारांची मालिका असते.

६२ सुरवंटाचे फुलपाखरू