पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धा वदंति' हे मान्य करू शकत नाहीत.यहुदी ख्रिचन किंवा मुस्लिम धर्मीयांना एकम् सत् हे मान्य असते पण बहुधा वदन्ति हे ते मान्य करू शकत नाहीत.ते सर्वधर्म समभाव न मानता फारफार तर सर्वधर्म सहभावापर्यंत येऊन पोचतात. ही सुद्धा खूप मोठी प्रगती आहे.इक्विझिशन किंवा जिहादच्या काळात,जगाची विभागणी कातोलिक व इन्फायडेल,मुस्लिम व काफर या कप्प्यांत केली जात असे.इन्फायडेलना किंवा काफरांना जगण्याचा अधिकारही नाकारला जात असे.त्यातून युद्धे सुरू होतात.एकोणिसाव्या शतकात उदय पावलेल्या कम्युनिझम या,धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हणणाऱ्या नव्या धर्मातही जे वर्गशत्रू म्हणून मानले जातात त्यांची कत्तल ही योग्य मानली गेली.हा विसाव्या शतकाचा नक्षलग्रस्त व जगातल्या बऱ्याच भौगोलिक भागातला इतिहास आहे.

 १४.०५ सर्व सामाजिक प्रश्नांचे मूळ कारण फक्त आर्थिक विषमतेत आहे ही कम्युनिस्टांची श्रद्धा होती.ते ईश्वर।अल्ला गॉड काहीच मानत नाहीत.ते सर्व इहवादी, प्रत्यक्षप्रामाण्यवादी होते.त्यांचे प्रतिपादन प्रत्यक्ष आर्थिक विषमता व तिचे निर्मूलन यांवर आधारलेले होते.कार्ल मार्क्सने सर्व जगाची विभागणी आहे-रे व नाही-रे ('हज' व 'हॅव-नॉटस्') या दोन कप्प्यांत केली.त्याचे विवेचन स्पष्ट कप्पेबंदपणावर आधारलेले आहे.त्याच्या अनुभवातली परिस्थिती १८४० ते १८८० पर्यंतच्या युरोपातल्या व खास करून ब्रिटनमधल्या वास्तवाच्या आकलनावर आधारलेली होती.युरोपातले देश राष्ट्र-राज्य ह्या, तशा,युरोपातही नव्या असलेल्या संकल्पनेवर आधारित,आर्थिक साम्राज्य जगभर पसरवण्यास उत्सुक असे देश होते.ब्रिटनचे साम्राज्य अमेरिकन वसाहती या जगाच्या नव्या भूभागातून माघार घेतल्यावर आफ्रिकी व आशियाई देशांत विशेषकरून भारतात स्थापित झालेले होते.व्यापारात एकाधिकार मिळवण्यासाठी राजसत्ता हातात घेण्यात आली होती.राजकीय प्रभुसत्ता स्थापन करण्यात आली होती.जगभरच्या साऱ्या देशांतून खेचून आणलेली संपत्ती बाळगणारे नवे नबाब व जमिनीच्या परंपरागत मालकीवर आधारित अशी संपत्ती बाळगणारे सरंजामशहा हा एक वर्ग आणि बाकी सारी जनता दुसऱ्या बाजूला अशी स्पष्ट दोन सामाजिक वर्गांत वांटणी हे एकोणिसाव्या शतकातले ब्रिटनमधले वास्तव मार्क्सच्या नजरेसमोर होते.खेचून आणलेल्या व वारशाने लाभलेल्या धनाची वाटणी कशी करायची,हा त्याच्या मते,महत्त्वाचा आर्थिक प्रश्न होता.उत्पादन कसे करायचे हा मुख्य प्रश्न नव्हता.केक वाटायचा कसा हा प्रश्न त्याला महत्त्वाचा वाटला.केक निर्माण कसा करायचा व केकचा आकार हा स्थिर असण्याची किंवा मानण्याची आवश्यकता नाही हे त्याचे आकलन नव्हते.

सुरवंटाचे फुलपाखरू ८१