या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
सौंदर्यरस
 

 'अग, मी काय सांगू ? पण सांगते. म्हणाले, भक्तीबरोबर स्वशक्तीची जाण हवी. दुष्टसंहार करणे आहे. बसल्या जागी टाळ कुटीत बसल्याने ते होणे नाही. रावण मातला त्याचा नाश कोणी केला ? वनवासी रामाने. कोठे होती शस्त्रे ? तरी जय झाला. तऱ्ही भय सोडणे. काय सांगू ताई तुला, श्रोता बसली मांडी चाळवीत नाही !'
 'आणि काशी त्या दिवशी काय म्हणत होतीस ?'
 'चुकलेच माझे, ताई, तूच खरी त्याची योग्यता ओळखलीस. तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो.',
 एका परित्यक्ता स्त्रीचे हे केवढे उदात्त मन आहे ! किती समर्थ आहे. ही मूर्ती स्नेहलताबाईंनी आपल्या लेखणीने निर्माण केली आहे. हा कल्पिताचा महिमा आहे.
 शिवप्रभूंना ताईची वार्ता समजली तेव्हा आधी पुढे चिटणीस पाठवून मागोमाग ते दर्शनास आले. आणि म्हणाले, 'कळो आले की, सकळ तीर्थरूप मातोश्री येथे वास्तव्य करून आहेत. म्हणून आशीर्वाद घेण्यास आलो.' असे म्हणून त्यांनी तिच्या पायांवर डोके ठेवले.
 ताईला धन्यता वाटली. ती म्हणाली, 'मऱ्हाटी साम्राज्याचे धनी आम्हास मातोश्री म्हणतात, आमचे अवघे कष्ट फिटले. कोणी आमची कीव करतात. पण आज दिसोन आले की, आमचा पुत्र कोटयवधींचा पोशिंदा आहे. अवधी खंत निमाली. त्रैलोक्यविजयी व्हा! उदंड औक्षवंत व्हा! आमचा आशीर्वाद आहे!'
 महाराजांनी वस्त्रालंकारांनी भरलेली तबके भेट म्हणून तिच्यापुढे ठवली. तेव्हा ती म्हणाली, 'आम्हास याची गरज नाही. जे खातो ते आपलेच आहे. आमचे गुरू समर्थस्वामी भिक्षा मागून निर्वाह करतात. ऐसियास आम्हांस ही उपाधी कशास ? राजियांनी रंजीस न व्हावे. आपल्या पुण्याईने आमचे भागते आहे.'
 समर्थांच्या शिष्यांनाही मातुःश्रींची चिंता असे, त्यांना कळले की मातुःश्री अत्यवस्थ आहेत. तेव्हा समर्थांना विचारून त्यांची जपमाळ प्रसाद म्हणून घेऊन, कल्याणस्वामी भेटीला आले. शिवप्रभूही आले. शिष्यांनी मांडी