या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
सौंदर्यरस
 

अनेक उपमा व रूपके साहित्यात येतात. रूपकात तर दोन वस्तूंचे तादात्म्यच असते. आपण प्रथम तानाजीशी एकरूप होतो, आणि मग त्याच्याबरोबर सिंहाशी आणि मग त्याच पद्धतीने कमलाशी, विजेशी, वटवृक्षाशी- म्हणजे एकंदर चराचर सृष्टीशी तादात्म्य पावतो. साहित्यातील रस व अलंकार यामुळे हे साधते. चराचर सृष्टीशी तादात्म्य पावणे म्हणजेच परमात्म्याशी- बव्हंशी तरी- तादात्म्य पावणेच होय. यालाच समाधी म्हणतात. पण या समाधीत 'आपण कोण आहो' याची जाणीव सतत जागृत असते. म्हणून ही 'सविकल्प समाधी' होय. योग्यांची, समाधी ती निर्विकल्प समाधी, त्या समाधीत 'मी' ही जाणीवही नसते.
 आपल्याला येथे या व्याख्येची चर्चा करायची नाही. मानवी मनाला आनंद कशामुळे होतो, याविषयीचा जो तात्यासाहेबांचा सिद्धान्त, तोच फक्त येथे लक्षणीय आहे. त्यांचे जीवनाचे भाष्य ते यातच सापडते. परमात्म्याशी एकरूप होण्याने मनाला खरा आनंद होत असतो. ती आत्म्याची आकांक्षा ज्या थोडयाफार प्रमाणात पुरी होते त्या प्रमाणात मनुष्याला आनंद मिळतो. साहित्याच्या वाचनाने आनंद होण्याचे कारण हेच की, त्यामुळे ती इच्छा बऱ्याच अंशी तृप्त होते.

*

 तात्यासाहेबांनी वाङ्मयविषयक जी व्याख्याने दिली, लेख लिहिले, ते बहुतेक सर्व १९३४-३५ च्या सुमाराचे किंवा त्याआधीचे आहेत. त्या सुमारास महाराष्ट्रात नवमतवाद सुरू झाला होता. त्यामुळे त्याचा परामर्श घेऊन 'उद्याचे मराठी वाङ्मय' कसे होईल याविषयी त्यांनी काही अंदाज बांधले होते. हे नवमतवादी वाङ्मय बव्हंशी इंग्रजी वाङ्मयाच्या अनुकरणानें लिहिले जात होते. त्या इंग्रजी वाङ्मयाच्या मागे मानवी जीवनाविषयी जी विचारसरणी होती, तीच हळूहळू महाराष्ट्रात स्वीकारली जाईल आणि त्या विचारसरणीतून निर्माण झालेले इंग्रजी वाङ्मय ज्या स्वरूपाचे होते तसेच आता मराठी वाङ्मय होत जाणार, असे त्यांनी भविष्य वर्तविले होते. जीवनाविषयीची विचारसरणी जशी बदलते, तसे वाङ्मयही बदलते, हा त्यांचा सिद्धान्त वर सांगितला आहेच.