पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
जळगांवचे कविसंमेलन

 एकदां टिळकांना कोटकांची तार आली “आय अॅम डाईंग कम अॅट वन्स.' टिळक उसने पैसे काढून पुण्यास गेले. कोटकांनी हंसत हंसत त्यांचे स्वागत केलें ! टिळक कोटकांवर फार संतापले. पण कोटकांना टिळ- कांना भेटण्याची व त्यांची चेष्टा करण्याची लहर आली होती. ते म्हणाले तुम्ही एवढे पंडित आणि तुम्हाला माझ्या तारेचा अर्थ कळला नाही! आय अॅम डाइंग टू सी यू" असा त्या तारेचा अर्थ. खरोखरच मी मरत असतो तर मीच कशी तुम्हाला तार पाठविली असती? दुसरी कोणी- पाठविली असती!
 ह्या दोघांच्या मध्ये पुष्कळच अंतर होते पण दोघांना एकमेक फार आवडत.
 टिळकांना आपल्या हातांत वर्तमानपत्र असावें असें फार वाटे. तेव्हां त्यांनी "ख्रिस्ती" नांवाचे पत्र काढले. त्या पत्रांत ख्रिस्ती धर्माचा उपदेश ख्रिस्तीतरांना व हिंदी संस्कृतीचा उपदेश ख्रिस्ती लोकांना असे. हे पत्र आमच्या घरांतील बऱ्याचशा पैशांचा चट्टामट्टा करून गत झालें, पण टिळकांची वर्तमानपत्राची खुमखुम मात्र कमी झाली नव्हती.
 शेवटी नगरास आल्यावर कोटकांचा व टिळकांचा पत्रव्यवहार खूपच खूप वाढलेला आढळून आला. दोघांच्या गांठी भेटी पुष्कळ होऊ लागल्या. टिळक ऊठ पळ पुण्यास पळू लागले आणि १५ डिसेंबर १९०५ ला "ख्रिस्ती नागरिक " पत्राचा जन्म झाला. भास्करराव कोटक ह्या पत्राचे मॅनेजिंग प्रोप्रायटर झाले. प्रसिद्ध वैय्याकरणी रे. गणपतराव नवलकर, इंग्रजी भागाचे संपादक झाले व टिळक मराठी भागाचे संपादक झाले. ही तिन्ही डोकी मोठी निर्भीड व हृदयें मोठी सडेतोड.) त्यामुळे ह्या पत्राने ख्रिस्ती समाजांत मोठी खळबळ उडवून दिली. पत्राने तीन वर्षे चालून ख्रिस्ती समाजांत मोठी जागृति करून व भास्करराव कोटकांच्या डोक्यावर मोठे कर्ज ठेवून आपली अवतार समाप्ति केली.
 ह्या पत्रांत टिळकांनी ज्या ज्या गोष्टी सुरू केल्या होत्या व ह्यांचें जें धोरण त्यांनी आंखले होते, त्याच गोष्टी व तेंच धोरण त्यांनी पुढे १९१२ साली 'ज्ञानोदय' त्यांच्या हाती आल्यावर शेवटपर्यंत त्या पत्रांतहि कायम ठेवले.