या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उशिरा परतले. खूप थकलेले. दारूचा मंद दर्प. तब्बेतही उतरलेली वाटली.
 पूर्ण रात्र मी जागीच ....
 मन आणि शरीर, दोहोत कर्तसवरतं असतं मन. मनानं दिलेले संकेत शरीरानं पाळायचे. मन, शरीर यांचं वेगळेपण कधी जाणवलंच नव्हतं आजवर.
 पण काल शरीराचं वेगळं ... बंडखोर अस्तित्व जाणवलं मला. रक्त कापरागत चरचरत जळत होतं. हातही निर्लज्ज. यांना जागे करणारे.
 गाढ झोपेतून अनंत चाळवले.
 'ओह ऽऽ नो, रेणू ! मी खूप थकलोय. लेट मी स्लीप. नो एनर्जी ॲट ऑल ...
 माझं मन थाड्कन् जाग्यावर आलं.
 शरीराची घृणा वाटली स्वतःच्या.
 कोण ही रेणू ?
 ... तिला तृप्त करू पाहताना थकलेले अनंत कोण ?

१७-६-७३

 हल्ली उमा सारखी सुरैनाकडे जाते. उमाचा किती आधार वाटतो मला. अशात आली नाही. नुसती हसते.
 काल आईचं पत्र आलंय. दमा उठलाय तिचा. तिला बोलवावसं वाटतं, पण दुसऱ्या क्षणी मनात येतं - दुरूनच, ठीक आहे. कुणी येऊ नये नि कुठं जाऊ नये, आपल्या जखमा आपण झाकूनपाकून सोसाव्यात.

३४ /स्वरांत