पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/151

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१२३

आणि तो घेणारा असें म्हणून गर्व वाहण्याचे तुम्हांस यत्किंचित् तरी कारण आहे काय? आपण परोपकाराची काही गोष्ट केली ह्मणजे जगाचे आपण बरें केलें असें आपल्यास वाटते; पण बरे म्हणजे काय आणि वाईट म्हणजे तरी काय ? परिस्थितीच्या दोन विशिष्ट स्वरूपांस ही नांवे आपणच दिली आहेत. आपल्या मनांत एखादी लालसा उत्पन्न झाली असतां ती ज्यायोगें तृप्त होईल तें बरें आणि याच्या उलट स्थिति असणे म्हणजे तें वाइंट, अशा आपल्या व्याख्या आहेत. परंतु कसल्याच प्रकारच्या लालसा ज्याला उरल्या नाहीत त्याला काही बरें नाही आणि कांहीं वाईटही नाही. यासाठी 'मी' आणि 'माझें' या कल्पनाद्वयापासून उद्भवणाऱ्या इच्छेचा त्याग केला, तर बरे आणि वाईट, सुख आणि दु:ख या द्वंद्वाचा नाश आपोआपच होईल. इच्छेचा त्याग करावा हे म्हणणे जितकें सोपे आहे त्याहून तसे करणे शतपट अधिक कठीण आहे, ही गोष्ट मलाहि कबूल आहे. परंतु हे असिधाराव्रत तडीस गेले तर कोणत्या पदाची प्राप्ति होणार आहे, याची थोडी तरी कल्पना ज्याला होईल तो हे व्रत आनंदाने स्वीकारील. हे व्रत जसजसे सिद्ध होऊ लागते तसतसे आपण अधिक स्वतंत्र होऊ लागतो. वास्तविक आम्हांवर सत्ता चालवून आम्हांस कर्म करण्यास भाग पाडणारी अशी एकहि शक्ति या विश्वांत जन्मास आली नाही. आमच्या इच्छेविरुद्ध आम्हांवर सत्ता चालविण्यास कोणीहि समर्थ नाही; परंतु आम्ही पदभ्रष्ट होतों, अहंकार आम्हांस पछाडतो, आणि मी कर्ता, मी भोक्ता असें आम्ही म्हणूं लागतो. कर्म आणि आम्ही यांचा अशा रीतीने एकजीव झाल्यावर कर्मापासून उद्भवणारी दु:खें भोगल्यावांचून सुटका आहे काय ? आपल्याच मुखपणाने आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला तर त्याबद्दलचे दुःख आपणांस भोगल्यावांचून गत्यंतर नाही. यासाठी 'मी' आणि 'माझें' ही भावना टाकून केवळ साक्षित्वाने तुम्ही कर्मे करूं लागलां म्हणजे सध्या जी शक्ति अनिवार्यपणे तुम्हांस कर्मे करावयास लावीत आहे, तिचा एक एक अवयव तुटून शेवटी ती गतप्राण होईल. अशा खऱ्या स्वतंत्र मनुष्याचे लक्षण हेच आहे की जगांत घडून येणाऱ्या गोष्टींपासून त्याला हर्ष अथवा विषाद होत नाही. कांहीं प्राप्त झाल्याचा जसा त्याला आनंद होत नाही तसेच सर्वस्व गेल्यास त्याला दुःखहि होत नाही. सारे जग इकडचे तिकडे झाले तरी त्याच्या स्थितीत अणुमात्र फरक पडत नाही. 'दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥' असे त्याचे लक्षण गीतेत सांगितले आहे.