पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/171

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१४३

याचा आपण प्रथम शोध करू लागतो. आपल्या मनांत तृष्णा इतकी रसरसत असतां तिच्यापासून दुःखाची प्राप्ति होऊ नये हे शक्य तरी आहे काय ? ज्यांनी जगावर महदुपकार करून ठेविले आहेत अशा महात्म्यांची नांवेंहि कोणास ऐकू न येतां ते जग सोडून गेले. बुद्ध आणि ख्रिस्त हे ज्यांच्या तुलनेने फिके पडतील अशा मनुष्यांनी आपली नुसती नांवेंहि कोणाच्या कानी जाऊ दिली नाहीत. आजपर्यंत प्रत्येक देशांत असे शेकडों महात्मे जन्मास आले आणि आपलें कार्य करून गेले. देहधारी असतां त्यांनी जगावर अनंत उपकार केले आणि ते गेले. त्यांचेच विचार बुद्ध आणि ख्रिस्त या रूपाने आपणांस प्रत्यक्ष दिसले; पण खुद्द त्यांचे दर्शन आपणांस झाले नाही, एवढेच नव्हे तर त्यांची नांवेंहि आपणास ऐकू आली नाहीत. स्वतःच्या ज्ञानाचे पर्यवसान मोठ्या नांवांत-कीर्तीत-व्हावे अशी इच्छाहि त्यांस कधी शिवली नाही. आपला विचार जगावर सोडून ते मोकळे होतात. त्याजबद्दल स्तुतीचा एखादा शब्द ऐकावा अथवा एखादा नवा धर्म अगर पंथ काढावा असेंहि त्यांस वाटत नाही. 'की बृहस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी अंगी जोडे । परी वेडिवे माजी दडे । महिमे भेणें ।' अशी त्यांची स्थिति असते. त्यांची वृत्ति ह्मणजे शुद्ध सात्विकतेची मूर्तीच असते. प्रेमरसाने ते ओथंबलेले असतात. गडबड आणि धडपड ही त्यांच्या स्वभावास खपतच नाहीत. हिमालयांतील एका गुहेत अशा एका योग्याचे दर्शन मला झाले. त्याचा अहंकार अगदी समूळ नष्ट झाला होता. सर्वतोपरी बद्ध असें जें मानवरूप तें पूर्ण नष्ट होऊन शुद्ध परमेश्वरस्वरूप तो झाला होता. त्याच्या एका हातास एखाद्या प्राण्याने दंश केला तर तो आपला दुसरा हात ताबडतोब पुढे करी. ‘परमेश्वराची मर्जीच तशी' असें तो ह्मणत असे. जें जें कांहीं घडतें तें तें परमेश्वराच्या मर्जीनेच घडते, असा त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला होता. त्याचे दर्शन फार करून कोणास होत नसे; तथापि प्रेम आणि ज्ञान यांची केवळ चिन्मूर्तीच तो होता.

 या सात्विक पुरुषांच्या खालोखाल ज्ञानी पण रजोगुणी अशा पुरुषांची पायरी असते. सात्विक पुरुषांपासून मिळालेले ज्ञान सर्व जगाला सांगण्याचे काम हे पुरुष करितात. अत्युच्च दर्जाच्या सात्विक पुरुषांनी जें शुद्ध ज्ञान सांठविलेले असतें तें जगांत पसरविण्याचे काम बुद्ध आणि ख्रिस्त करीत असतात. 'मी पंचविसावा बुद्ध आहे' असे गौतमबुद्धाने जागोजाग सांगितले आहे. पहिले चोवीस बुद्ध कोण होते, त्यांनी काय सांगितले वगैरे हकीकत आपणा मानवजातीस उपलब्ध नाही. तथापि त्यांच्याच ज्ञानाच्या बळावर ज्याने आपल्या ज्ञानरूपी