पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/197

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१६९

शरीररक्षणाची इच्छा असणे हे देहबुद्धीचे द्योतक आहे. या दोन बुद्धींच्या तंट्यामुळेच प्राण्यांमध्ये व्यक्तिविशेष आढळून येतो. या दोन बुद्धीच्या भांडणांत जिचे प्राबल्य अधिक असेल, त्या मानाने उत्क्रांतीचे प्रमाण कमी अधिक होईल. भोवतालचे जड विश्व त्याच्या देहबुद्धीस एकसारखें प्रोत्साहन देत असते व मुक्तीची कल्पना त्याला दुसऱ्या बाजूस ओढीत असते. अशा रीतीने हे भांडण अनंतकाल सुरू आहे. या भांडणास केव्हांहि खळ ह्मणून पडत नाही. मानवी जातींत नाना धर्म आणि नाना पंथ उपस्थित झाले आहेत व त्यांत पुनः पोटधर्म व पोटपंथ उपस्थित होत आहेत व लढाया करीत आहेत. या स्थितिबद्दल आपणांस केव्हां केव्हां विषाद वाटतो; परंतु वस्तुतः यांत विषाद मानण्यासारखे काही नाही. ही भांडणें मनुष्याच्या उत्क्रांतीस अत्यावश्यक अशीच आहेत. अनेक पंथ उपस्थित व्हावे हे अगदी न्याय्य आहे. आणखीहि शेकडों धर्म आणि पंथ अस्तित्वात आले, तरी त्या सर्वांचे साध्य एकच आहे, ही खूण एकवार आपणांस पटली ह्मणजे तंट्याचे कारणच उरणार नाही.

 ज्यावर हे सर्व विश्व भासमान झाले आहे व जो सर्वदा मुक्त स्थितीत असतो, त्याला आपण परमेश्वर या नावाने ओळखितो. परमेश्वराचे अस्तित्व कबूल करणे भागच आहे. मुक्तीची कल्पना वजा केली, तर तुह्मांस जिवंत राहणेहि अशक्यच आहे. कारण ही कल्पना सत्य करण्याकरितांच ही सारी धडपड आहे. ही कल्पना नाहींशी झाली, तर धडपड बंद होणार आणि धडपड बंद झाली तर देहबंध तरी कसा टिकणार ? जीवित हे या धडपडीचेंच व्यक्त रूप आहे. धडपडीची इच्छा गेली, की जीवितहि संपलेंच. याकरितां मुक्तीच्या कल्पनेस फांटा देणे तुह्मांस शक्यच नाही. मुक्तीची कल्पना कबूल केली, की तिची सहचारी कल्पना तिजबरोबर अवश्य येणारच. स्वतंत्रतेची यत्किंचित्हि कल्पना तुमच्या ठिकाणी उदय पावली नसेल, तर तुम्हांस थोडीदेखील हालचाल करणे शक्य नाही. आपण अमुक ठिकाणी जाऊ आणि अमुक करूं असा विचार जेव्हा तुमच्या मनांत येतो, तेव्हां तसें करण्यास आपण मुखत्यार आहों-स्वतंत्र आहों-या कल्पनेचाहि तुमच्या विचारांत अंतर्भाव होत नाही काय ? यावरून स्वतंत्रतेच्या-मुक्तीच्या कल्पनेवांचून जगणेहि कसे अशक्य आहे, ही गोष्ट बरोबर तुमच्या ध्यानीं येईल. प्राणिमात्रांत दिसून येणाऱ्या धडपडीची शास्त्रीय मीमांसा एखादा प्राणिशास्त्रवेत्ता तुह्मांस सांगेल. त्याचे सर्व ह्मणणे कबूल केले, तरी स्वातंत्र्याची बुद्धि हीच या धडपडीच्या मुळाशी आहे हे आमचे ह्मणणे त्यास खोडून काढता येणार नाही.