पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/294

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२६९

आणि कांता यांस अगदी तुच्छ समजणारा मनुष्य येथे त्यांच्या पाहण्यांत कोणीच आला नव्हता. तेव्हां मी ढोंगी आहे, अशी त्यांची सहजच कल्पना झाली. पावित्र्य आणि ब्रह्मचर्य यांजबद्दल हिंदूंच्याप्रमाणेच पाश्चात्त्यांच्या कल्पना आहेत असें तुह्मी समजू नका. या गुणांस प्रथमस्थान देण्याऐवजी त्यांच्या जागी सद्गुण आणि धैर्य यांची त्यांनी स्थापना केली आहे. आतां येथे बरेच अनुयायी मला मिळत आहेत. कनक आणि कांता यांच्या सपाट्यांत न सांपडतां राहतां येणे शक्य आहे, अशी त्यांची खात्री होऊं लागून या गुणांबद्दल पूज्यभावहि त्यांजमध्ये हळू हळू उत्पन्न होऊ लागला आहे. धीराने आणि निश्चयाने आपले काम करीत राहिले ह्मणजे यश केव्हां तरी येतेच. परमेश्वर सदैव आपणांस सुखी ठेवो.

आपला,

विवेकानंद.

पत्र १२ वें.

न्यूयार्क-९५.

प्रिय---

 सामाजिक सुधारणा या नांवाने चालू असणाऱ्या चळवळींत केव्हांहि न पडण्याची तुह्मी खबरदारी घ्या. धर्मतत्वांचा प्रसार होऊन त्यांतील तत्वें मनांत पक्की बाणून ती रोजच्या व्यवहारांत प्रत्यक्ष दिसू लागल्याशिवाय कोणतीहि सुधारणा शक्य नाही हे विसरू नका. लोकांच्या चालीरीति, धर्मभोळेपणा इत्यादि गोष्टींचा उल्लेख करून त्यांजवर टीका करीत बसण्याचे आपले काम नव्हे. धार्मिक जीवन आणि परमेश्वरी मार्ग यांची ओळख लोकांस करून देणे हे आपले काम आहे. हे करीत असतां आपले सद्गुरु आणि परमेश्वर यांजवरील विश्वास यत्किंचितहि ढळू देतां उपयोगी नाही. हा विश्वास दृढ बाळगून धैर्याने काम करीत राहिले म्हणजे तुमच्या केसासहि धक्का लावण्याची कोणाची छाती नाही. माझा उत्साह आणि सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर आहे. माझ्या शूर मुलांनो, आतां कामास आरंभ करा.

तुमचा स्नेही,

विवेकानंद.