पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/98

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


लेल्या त्या राजपुत्रांचा आशाभंग झाला. शेवटी स्वयंवर न होतांच सभा विसर्जन होते की काय अशी सर्वांस भीति वाटूलागली. अशा समयीं एक संन्यासी तेथे आला. सूर्यालाहि लाजविणारी कांति त्याच्या मुखावर झळकत होती. त्याला पाहतांच राजकन्येने त्याच्या गळ्यांत माळ घातली. परंतु संन्याशानें तत्क्षणीच ती माळ गळ्यांतून काढून दूर फेंकून दिली व म्हटले "राजकन्ये, मी संन्याशी आहे हे तुला दिसत आहेना ? मला लग्न करून काय करावयाचे आहे ?” त्याचे भाषण ऐकून तिच्या बापाला असे वाटले की संन्यासी भिकारी असल्यामुळे राजकन्येशी लग्न करण्यास भीत असेल. तो त्या संन्याशाला ह्मणाला, “माझ्या मुलीबरोबरच आपण अर्ध्या राज्याचेहि मालक आतांच होणार आहां व माझ्या पश्चात् सर्व राज्य आपणासच मिळणार आहे.” राजानें असें ह्मणतांच राजकन्येने ती माळ पुनः यतीच्या गळ्यांत घातली. परंतु संन्याशाने ती पुनः काढून फेकून दिली व ह्मटलें “ राजा, लग्न करणे हा माझा धर्म नव्हे." असें ह्मणून तो यति झपाट्याने तेथून निघून गेला. परंतु त्याच्या दर्शनाने राजकन्या अत्यंत मोहित झाली होती, ती ह्मणाली " लग्न करावयाचे तर याच्याशीच करीन अथवा तशीच मरून जाईन." असें ह्मणून ती त्याच्या मागोमाग जाऊ लागली.

 हा सर्व प्रकार आपला राजा व संन्यासी पाहत होते. संन्यासी राजास ह्मणतो, "राजा, आपणहि या दोघांच्या मागे जाऊन काय चमत्कार होतो तो पाहं." संन्याशाने असें ह्मणतांच आपला राजा व संन्यासी त्या दोघांच्या मागे थोड्या अंतरावर चालू लागले. चालतां चालतां तो संन्यासी बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर त्यास एक घोर अरण्य लागले. त्या संन्याशाने त्या अरण्यांत प्रवेश केला. त्याच्या मागोमाग आलेली राजकन्याहि त्या अरण्यांत शिरली. हे पाहून आपला राजा व संन्याशी हे दोघे त्यांच्या मागोमाग त्या अरण्यांत शिरले. हे अरण्य त्या पहिल्या संन्याशाच्या चांगल्या माहितीचे असल्यामुळे त्यांतील सर्व आडवाटा त्यास अवगत होत्या. त्यांपैकी एका आडवाटेने जाऊन तो संन्यासी दिसेनासा झाला. त्या बिचाऱ्या राजकन्येस त्याचा कोठे मागमूसहि लागेना: तेव्हां ती भयभीत होऊन एका वृक्षाखाली बसली. तिला तिच्या पित्याचे स्मरण होऊन ती अश्रु ढाळू लागली. इतक्यांत आपला राजा व संन्यासी है या ठिकाणी आले व तिला ह्मणाले, "राजकन्ये, भिऊ नको. या अरण्यातून आम्ही तुला सुरक्षित बाहेर नेऊन तुझ्या पित्याच्या स्वाधीन करूं. परंतु आता