पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

९६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

वता येते की नाही याचे परीक्षण सूक्ष्म दृष्टीने करीत जा. साऱ्या विश्वाच्या शक्ती एकवटून आपणावर तुटून पडल्या तरी यत्किचित्ही कंप पावणार नाही अशी आपल्या चित्ताची तयारी ज्या दिवशी होईल, त्या दिवशी आपण साम्यावस्थेला पोहोंचलों असें होईल. " आतां वसुधा तळही बुडो । वरी हे गगन कोसळुनी पडो॥ " आपल्या चित्तास भंग म्हणून नाही असे जेव्हां होईल तेव्हांच आपणास मुक्तिसुखाचा लाभ होईल. अशा प्रकारची साम्यावस्था म्हणजेच मुक्ति. मुक्ति म्हणून कांही निराळा पदार्थ आहे असें नाहीं. मुक्ति या जगांत-येथेंच-आहे. ती बाहेरून कोठून आणावयाची आहे असे नाही. याच मूळ कल्पनेपासून बाकीच्या साऱ्या विचारपरंपरांचा उदय जगांत झाला आहे. हा मूल सिद्धांत म्हणजे एक झराच असून त्यापासून अनेक सुंदर सरितांचा उगम झाला आहे, आणि त्यामुळे जग पावन झालें आहे. या अनेक सरिता परस्परांशी विरोधी असाव्या असाही भास केव्हां केव्हां होतो; तथापि तो विरोध नसून विरोधाभास मात्र असतो. त्याचप्रमाणे या मूल सिद्धांताबद्दल व त्यापासून निघणाऱ्या उपसिद्धांतांबद्दल पुष्कळ वेळां गैरसमज झाल्याचेही पाहण्यांत येते. पुष्कळांना या सिद्धांताचा अर्थच समजत नाही; तथापि हा सिद्धांत खरा आहे असे त्यांचे अंतर्याम त्यांना सांगत असते. केवळ ध्यानमग्न व्हावें या हेतूने बाह्यजगाशी असलेला सारा संबंध तोडून टाकून पर्वतगुहांचा अथवा अरण्यांचा आश्रय करणारे धीर पुरुष प्रत्येक राष्ट्रांत आढळतात. अशा रीतीने एकांतवास पतकरून ते ध्यान कशाचे करतात? याच एका सिद्धांताचें. उलटपक्षी अत्यंत उत्साही, तेजस्वी आणि खटपटी माणसें आपण होऊन सामान्य जनतेत संचार करीत असतात आणि गरीबदुबळे व आजारी आणि दुःखीकष्टी माणसांच्या यातना कमी करून त्यांस धीर देण्यासाठी धडपडत असतात. असे करण्यांत या माणसांचा मूलहेतु काय असतो ? या मूलसिद्धांताचा शोध लावावा हाच. हे दोन मार्ग परस्परांपासून अगदी भिन्न आहेत. किंबहुना ते परस्परांस विरोधी असावे असाही निश्चय सकृद्दर्शनी होत असतो. सर्वसंगपरित्याग करून अरण्याचा अथवा गुहेचा आश्रय करणारा मनुष्य या दुसऱ्या प्रकारच्या लोकांस तुच्छ समजत असतो. दुसऱ्यांची दुःखें हलकी करण्यासाठी त्यांच्यांत मिसळून जाणारी परोपकारी माणसें संसारपंकांत बुडालेली आहेत